Nipani : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान

मांजरी : कृष्णा काठावरील सर्वच गावात गेल्या पाच दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे बहुसंख्य भागात ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. द्राक्षबागातही पाणी साचल्याने पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परतीच्या पावसाने फळभाज्या, पालेभाज्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आठवड्याच्या बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱय़ांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत. कृष्णा काठावरील अनेक गावात वीट उत्पादन हंगामाच्या प्रारंभीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्यांनाही मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

कृष्णा काठावर जुलै महिन्यात महापूर आला होता. त्याचा सर्वाधिक फटका ऊस शेतीला बसला. हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस बाधित झाला. त्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. नुकसानग्रस्त अनेक शेतकऱयांना आजपर्यंत एक रुपयांचीही आर्थिक मदत मिळाली नाही. महापूर, अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचलेले उसाचे पीक शेतकऱयांनी पराकाष्ठा करून जगवले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसामुळे ऊसतोडणीत अडथळे येत आहेत. उसामध्ये पावसाचे पाणी साचले असून रस्ते चिखलमय झाले आहेत. अनेक भागात तोडलेला ऊस शेतातून बाहेर काढताच येत नाही, अशी स्थिती आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

कृष्णा काठावरील माळभागासह इतर परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकाचे उत्पादन घेतले जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या भागातील अर्थचक्र चालते. मात्र परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही अनेक बागेत पाणी साचून आहे. पावसाने फुलोरा गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाण्याचे संकट ओढावले आहे. पुढील दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहील, तसेच काही भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे ऊस आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत

ऊसतोड मजुरांचे हाल

कृष्णा काठासह सीमाभागातील सर्वच साखर कारखान्यांचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने ऊसतोड मजूरांची गैरसोय होत आहे. राहण्यासाठी केलेल्या खोपीत पाणी शिरले. तसेच धान्याची पोती, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. अनेकांनी राहण्यासाठी मंदिर, बसस्थानक, शाळेचा आधार घेतला आहे. पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हाल होत आहेत.

loading image
go to top