पहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम 

परशुराम कोकणे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

यंदाही एम. ए. पटेलच! 
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर, सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे संचालक महेश आंदेली यांनी पंच म्हणून काम पाहिले. पहिला क्रमांक एम. ए. पटेल, द्वितीय क्रमांक शिकलगार ब्रदर्स, तिसरा क्रमांक सिद्धेश्‍वर फायर वर्क्‍स यांना देण्यात आला. तर उत्तेजनार्थ म्हणून जय महाराष्ट्र फायर वर्क्‍स आणि आदित्य फायर वर्क्‍स यांना गौरविण्यात आले.

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले. ध्वनी आणि हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी चांगला निर्णय घेतल्याबद्दल सजग भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाक आतंकी खबरदार, भारत है तयार.., किसान का विकास देश का विकास, स्मार्ट सोलापूर सर्वांची जबाबदारी आदी संदेश शोभेच्या दारूकामातून देण्यात आले. 

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्‍यांची आतषबाजी करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे अशी नोटीस पोलिसांच्यावतीने श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीला बजाविण्यात आली होती. देवस्थान समितीने पोलिसांच्या सूचनेचे स्वागत करून शोभेचे दारूकाम कार्यक्रमातील ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांची आतषबाजी थांबविली. 

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभेच्या दारूकामाचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी देवस्थान यात्रा समितीचे अध्यक्ष रामकृष्ण नष्टे, पंचकमिटीचे विश्‍वस्त ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विश्‍वनाथ आळंगे आदी उपस्थित होते. संगदरी (ता. दक्षिण सोलापूर) येथील श्री सिद्धेश्‍वर फायरवर्क्‍स यांनी "श्रीं'चे मंदिर, गेट वे ऑफ इंडिया, नागराज, लाईट झाड, सरूचे झाड, डिस्को झाड, इलेक्‍ट्रिक धबधबा, अशोक चक्र, पृथ्वीचे डिझाईन, राज दरबारी अनार, ट्यूब कांडी आदी कलाकृती शोभेच्या दारूकामातून सादर केली. न चिंता न भय सिद्धेश्‍वर महाराज की जय... या दारूकामाने उपस्थितीतांच्या टाळ्या मिळविल्या. 

पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील हमीद शिकलगार यांनी मल्टी कलर लाईट, अनार हुक्के, तीस फुटांचा सिल्व्हर धबधबा, ऑटोमॅटिक रोझ, उगवता सूर्य, फाइव स्टार क्रॅकलींग चक्र उडविले. म्हैसूर कारंजा, नर्गिस झाड, सिल्व्हर मॅजिक चक्र यांनी वाहवा मिळविली. 

सोलापूरचे एम. ए. पटेल यांनी सिद्धेश्‍वर महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आपल्या कलाकृतीला सुरवात केली. ऑलिंपिक तारामंडळ, नायगरा फॉल्स, भारताचा नकाशा, 35 फुटांचा त्रिशूल, मोरपंखी डिझाईन, हर हर महादेव, मौत का कुवा आदी कलाकृती सादर केल्या. त्यांनी पाक आतंकी खबरदार, भारत है तयार..., किसान का विकास देश का विकास, स्मार्ट सोलापूर सर्वांची जबाबदारी हे संदेश दिले. 

सुरली (ता. कराड, जि. सातारा) येथील आदित्य फायर वर्क्‍स यांनी शोभेच्या दारूकामातून सुदर्शन व्हील, मेरी ग्रो राऊंड व्हील, टू इन वन, रंगीत धबधबा, फ्लॉवर पॉट, सुवर्णपदक व्हील आदींचे दर्शन घडविले. चौसाळा (जि. बीड) येथील जय महाराष्ट्र फायर वर्क्‍स यांनी रोशन गेट, मंदिर झाड, दीप लाईट, ओम, म्हैसूर कारंजा, नागराज आदी कलाकृती सादर केल्या. 

यंदाही एम. ए. पटेलच! 
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर, सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे संचालक महेश आंदेली यांनी पंच म्हणून काम पाहिले. पहिला क्रमांक एम. ए. पटेल, द्वितीय क्रमांक शिकलगार ब्रदर्स, तिसरा क्रमांक सिद्धेश्‍वर फायर वर्क्‍स यांना देण्यात आला. तर उत्तेजनार्थ म्हणून जय महाराष्ट्र फायर वर्क्‍स आणि आदित्य फायर वर्क्‍स यांना गौरविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firecrackers in siddeshwar yatra in Solapur