पगार न दिल्याने उद्योजकावर गोळी झाडल्याचे स्पष्ट

palus crime.jpg
palus crime.jpg

पलूस-येथील उद्योजक प्रदिप आनंदराव वेताळ यांच्यावरील गोळीबार केल्याप्रकरणी कामगार सुरज सुधाकर चव्हाण (वय 26, रा. डफळापूर, ता. जत ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. तीन महिन्याचा पगार न दिल्याच्या रागातून वाद निर्माण झाला. त्यामुळे चव्हाणने वेताळ यांच्यावर गोळीबार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गोळीबारानंतर चोवीस तासाच्या आत चव्हाणला अटक करण्यात यश आल्याची माहीती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 


गुरुवारी (ता. 27) पावणे दोनच्या सुमारास सुमारास प्रदिप वूतळ हे नेहमी प्रमाणे औद्योगिक वसाहत येथील सुजाता इंडस्ट्रीजमधून जेवण करण्यासाठी घराकडे निघाले होते. पलूस येथील जि. प. शाळेसमोरील घराकडे त्यांच्या गाडीतून निघाले. गाडीत ते एकटेच होते. तेव्हा त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चव्हाणने वेताळ यांच्यावर घराच्या गेटसमोरच दुचाकीवरून येऊन गोळी झाडली. सुदैवाने गोळी गाडीच्या डाव्या बाजुच्या काचेवर लागून, ती चालकाच्या बाजूकडील सिटच्या वरील बाजूत घुसली. अचानक झालेल्या गोळीबारातून वेताळ थोडक्‍यात बचावले. गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले होते. 


भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर पलूस पोलिसांसमोर हल्लेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान होते. आसपास कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. हल्लेखोरांना कोणीही स्पष्ट पाहिले नव्हते. तसेच प्राथमिक चौकशीत वेताळ यांनीही कोणावर संशयही व्यक्त केला नव्हता. अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले आणि पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन वेताळ यांच्याकडे संशयित कोण असू शकतात? याची विचारपूस केली. 
वेताळ यांच्या कारखान्यात जाऊन कामगारांकडेही चौकशी केली. सायंकाळनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक ही तपासात सक्रीय झाले होते. अखेर रात्री उशीरा गुन्हे अन्वेषणच्या पथकास वेताळ यांच्यावर एका कामगारानेच गोळीबार केल्याची माहिती खब-याकडून मिळाली.

पथकाने तत्काळ कामगार सुरज सुधाकर चव्हाण याच्या डफळापूर (ता. जत) गावात सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तो बोलता झाला. वेताळ यांच्यावर गोळी झाडल्याची कबूली दिली. सन 2017 मध्ये चव्हाण हा वेताळ यांच्याकडे कामावर होता. काम सोडल्यानंतर वेताळ यांनी तीन महिन्याचा पगार दिला नव्हता. दोघांमधील आर्थिक वाद विकोपाला गेला होता. त्यातून आलेल्या रागातून चव्हाण याने वेताळ यांच्यावर गावटी पिस्तुलाने गोळी झाडली असल्याचे चव्हाण याने कबुल केल्याचे अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरिक्षक श्रीकांत पिंगळे, पलूसचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यावेळी उपस्थित होते. 


दरम्यान गोळीबार प्रकरणात आणखी कोणी समाविष्ट आहे का? तसेच गोळीबारामागे आणखी काही कारण आहे काय? याचा तपास सुरु आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व पिस्तुल अद्यापही जप्त केले नाही. लवकरच त्याचा तपास करण्यात येईल असेही अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. गुन्हे अन्वेषणच्या पथकामध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण शिंदे, प्रदिप चौधरी, सागर लवटे, बिरोबा नरळे, साईनाथ ठाकुर, निलेश कदम, संदीप गुरव, अनिल कोळेकर, संतोष गळवे, मेघराज रोपनर, सचिन धोतरे, विकास भोसले आदींचा समावेश होता. 

चोवीस तासात छडा- 
उद्योजक प्रदिप वेताळ यांच्यावर कोणत्या कारणाने हल्ला झाला. कोणी केला. याबाबत उद्योजक आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणणेचे मोठे आव्हान होते. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 24 तासाच्या आत आरोपीस अटक केली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com