शिवथाळीला मिळाला अखेर "हा' मुहूर्त

विनायक लांडे
सोमवार, 13 जानेवारी 2020

राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी या शिवभोजन केंद्रांचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

नगर : शिवभोजन योजनेत गरिबांना अल्प दरात भोजन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यातील पहिल्या पाच केंद्रांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज नगरमध्ये मंजुरी दिली आहे.

अवश्‍य वाचा-  सचिन... सचिन... शिर्डीत जयघोष

राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी या शिवभोजन केंद्रांचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केली. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी जिल्ह्यात सहा ते सात प्रस्ताव आले होते. त्यांतील पाच प्रस्तावांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.

सक्षम केंद्रचालकांची शोधमोहीम

दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी वर्दळीच्या ठिकाणी सक्षम केंद्रचालकांची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू होती. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिवभोजनालय सुरू होणार आहे. त्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेचा विस्तार केला जाणार आहे.

दहा रुपये नाममात्र शुल्क

सक्षम चालकांची निवड जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहायक पुरवठा अधिकारी सुनील सौंदाणे, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर आदी जिल्हास्तरीय समितीकडून झाली आहे. 
समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी द्विवेदी आहेत. गरजूंकडून थाळीसाठी दहा रुपये नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- (व्हिडीओ) युद्धथरार.. सामर्थ्याचे प्रदर्शन 

प्रायोगिक तत्त्वावर सुरू

उर्वरित रक्कम अनुदानाच्या रूपात संबंधित चालकांना मिळणार आहे. यासाठीचा निधी अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या योजनेची जिल्ह्यात पथदर्शी अंमलबजावणी करण्यासाठी पुरवठा विभागाने पाऊल उचलले आहे. गरजूंना योग्य दर्जाचे भोजन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून अंमलबजावणीसाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे.

वेळोवेळी अन्नाचा दर्जा तपासणार

शिवभोजनाची वेळ दुपारी 12 ते दोन असणार आहे. एका भोजनालयात कमीत कमी 75, जास्तीत जास्त 150 थाळ्यांचे भोजन राहणार आहे. भोजनालयात शासकीय कर्मचाऱ्यांना जेवण्यास सक्त मनाई आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी अन्नाचा दर्जा तपासण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण

दुर्दैवाने अन्नातून विषबाधा झालीच, तर याची जबाबदारी चालकाकडे राहील. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या तत्परतेमुळे राज्यातील पहिले शिवभोजन केंद्र नगरमध्ये मंजूर झाले आहे. प्रशासनातर्फे केंद्रचालकांना उद्या (मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

पहिली पाच शिवभोजन केंद्रे 

  • हमाल पंचायत संचालित "कष्टाची भाकर' (माळीवाडा बसस्थानक)
  • हॉटेल सुवर्णम्‌ प्राइड संचालित अन्नछत्र (तारकपूर)
  • हॉटेल दत्त (रेल्वेस्थानकासमोर)
  • कृष्णा भोजनालय (जिल्हा रुग्णालयाजवळ)
  • हॉटेल आवळा पॅलेस (मार्केट यार्ड प्रवेशद्वार)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first five Shiv Bhojan centers in nagar