सांगली जिल्ह्यात पहिले महामार्ग पोलिस केंद्र; कवठेमहांकाळचा प्रस्ताव मंजूर

घनशाम नवाथे 
Monday, 30 November 2020

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या हद्दीतून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी महामार्ग पोलिस केंद्र मंजूर झाले आहे.

सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या हद्दीतून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी महामार्ग पोलिस केंद्र मंजूर झाले आहे. कवठेमहांकाळ महामार्ग पोलिस केंद्र या नावाने ते लवकरच कार्यरत होणार आहे. महामार्गावरील पोलिस केंद्रासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची 34 पदे मंजूर झाली असून, जिल्हा पोलिस दलातून ही पदे भरली जातील. जिल्ह्यातील हे पहिलेच महामार्ग पोलिस केंद्र असेल. 

राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्य मार्गावर 63 पोलिस मदत केंद्रे होती. त्यात नव्याने 13 मदत केंद्रांची भर पडली आहे. नव्या महामार्ग पोलिस केंद्रात कवठेमहांकाळ पोलिस केंद्राचा समावेश आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाणे हद्दीतून सध्या मिरज-पंढरपूर हा राज्य महामार्ग जातो. रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्गदेखील जातात. भविष्यात वाहनांची वर्दळ वाढणार आहे. सध्या जिल्ह्यात मिरज-पंढरपूर राज्य महामार्गावर अपघातांचे सर्वाधिक प्रमाण आहे. कवठेमहांकाळ पोलिसांची अपघातानंतर धावपळ होते. त्यामुळे महामार्ग पोलिस केंद्र आवश्‍यक असल्यामुळे दीड वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवला होता. वाहतूक नियंत्रण शाखेचे तत्कालीन सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार प्रस्ताव पाठवला होता. 

कवठेमहांकाळ महामार्ग पोलिस केंद्र मंजूर झाले आहे. या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलिस हवालदार आठ, पोलिस शिपाई 21 व चालक 3 अशी 34 पदे मंजूर केली आहेत. जिल्हा पोलिस दलातून या केंद्रासाठी पोलिसांना प्रतिनियुक्तीवर जाता येईल. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सर्व पोलिस ठाण्यांना संदेश पाठवले आहेत. महामार्ग पोलिस केंद्रासाठी इच्छुक पोलिसांना 15 डिसेंबरपर्यंत विनंती अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जांची छाननी करून अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) मुंबई यांच्याकडे ते पाठवले जाणार आहेत. 

पोलिस अधीक्षकांची शिफारस असलेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. महामार्ग केंद्रासाठी निवड करताना जास्त बक्षिसे असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने विचार केला जाईल. यापूर्वी महामार्ग पोलिस केंद्रात कार्यरत नसलेले, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान, स्वच्छ चारित्र्य आदी निकष पूर्ण करणाऱ्यांची शिफारस केली जाणार आहे. त्यानंतर अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून अंतिम नियुक्ती केली जाईल. 

पोलिस मदत केंद्राचे कार्यस्वरूप 

  • महामार्गावरील अपघाताची माहिती पोलिस ठाण्यास देणे 
  • अडकलेल्या वाहनचालकांना मदत करणे 
  • वाहतूक सुरळीत राहील यासाठी दक्षता घेणे 
  • महामार्गावरील लूटमारी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे 
  • वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी उपाययोजना करणे 

पेठनाका प्रस्ताव प्रलंबित 
कवठेमहांकाळ आणि पेठनाका येथे महामार्ग पोलिस केंद्र मंजूर होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. कवठेमहांकाळचा प्रस्ताव मंजूर झाला. पेठनाक्‍यावरील केंद्राचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समजते. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first highway police station in Sangli district; Kavathemahankal's proposal approved