esakal | देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य यंदा पर्यटकांविना ओस 
sakal

बोलून बातमी शोधा

The first man made sanctuary in the country this year without tourists

सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती धो. म. मोहिते यांच्या ध्यासातून व लोकसहभागातून झाली आहे.

देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य यंदा पर्यटकांविना ओस 

sakal_logo
By
स्वप्नील पवार

देवराष्ट्रे (सांगली)- देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आणि हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात  राज्यातून व परराज्यातून पर्यंटक व शालेय सहली निसर्गाचा मनमुराद आनद घेण्यासाठी येत असतात. परंतु, मार्च महिन्यापासून कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे शासन निर्णयाने अभयारण्य बंद आहेत. त्यामुळे अभयारण्य प्रशासनास मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक व निसर्गप्रेमी यांचा हिरमुड झाला आहे.


यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य  वन्यजीव विभागास दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. सह्याद्रीच्या कुशीत असलेले अभयारण्य श्रावण मासात हिरवाईने फुलते व हरणांच्या संख्येत वाढ होते. यामुळे हरणांचे दर्शन आणि येथील छोटे-छोटे धबधबे, प्राचीन हेमाडपंथी मंदिर, श्री क्षेत्र दक्षिण काशी सागरेश्वर देवस्थान नजीक असल्याने राज्यातून व परराज्यातून अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. 


सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती धो. म. मोहिते यांच्या ध्यासातून व लोकसहभागातून झाली आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चोरस किलोमीटर आहे. या ठिकाणी असणारा किर्लोस्कर पाॅईंट, फेटा पाॅइंट, महालगुंड, मृगविहार, छत्री बंगला, बांबूकुटी, बालोउद्यान याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा करण्यात आली आहे. यासह अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथे १४२ प्रजातीच्या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये साळूखी, सुगरण, सूर्यपक्षी, पिंगळा, सुतारपक्षी, कोकीळ, पोपट, पावशा आदी पक्षी आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक येथे येतात. तसेच भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास जुय्वेल याठिकाणी आहेत.
 


माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्यासाठी भरघोस निधी देऊन अभयारण्याचा कायापालट केला. या ठिकाणी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी बांबूहाउसची उत्तम सोय आहे. त्यामुळे सागरेश्वर वन्यजीव विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली होती या उत्पनातून वन्यजीव प्रशासनास पन्नास टक्के व ग्राम परिस्थितीकिय विकास समितीस पन्नास टक्के मिळत होते. यातून सागरेश्वर वन्यजीव विभाग अभयारण्यात सोयी सुविधासाठी खर्च करतात. तर ग्राम परिस्थितीकिय विकास समिती गावातील सोयी सुविधांसाठी खर्च करते. परंतु यंदा कोरोनामुळे अभयारण्य बंद आहे. यामुळे यावर्षी अभयारण्यातील व गावातील होणार विकासास ब्रेक लागला आहे तर निसर्गप्रेमींना अभयारण्य बंद असल्याने निसर्गाचा आस्वाद घेता येणार नाही.

हे पण वाचा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पाठ्‌यपुस्तकातून वगळला... 

कोरोनाच्या संकटामुळे सागरेश्वर अभयारण्य शासन आदेशाने मार्च महिन्यापासून बंद आहे. श्रावण मासात येथे हजारो पर्यटक, सहली व निसर्गप्रेमी येत असतात. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यातून अभयारण्य विकासाचा आराखडा केला जातो. परंतु, अभयारण्य बंद असल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले असून याचा परिणाम विकास कामावर होणार आहे.
- अनिल जेरे, सहाय्यक वनसंरक्षक, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य  

संपादन- धनाजी सुर्वे