पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील 22 हजार जणांना लस

जयसिंग कुंभार
Saturday, 9 January 2021

देशभरात प्रशासकीय स्तरावर कोविड लसीकरणाची लगीनघाई सुरू झाली आहे. आजच (शुक्रवारी) यासाठीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ड्राय रन लसीकरण मोहीम झाली. या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी "सकाळ'शी साधलेला संवाद. 

देशभरात प्रशासकीय स्तरावर कोविड लसीकरणाची लगीनघाई सुरू झाली आहे. आजच (शुक्रवारी) यासाठीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ड्राय रन लसीकरण मोहीम झाली. या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर सांगली  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी "सकाळ'शी साधलेला संवाद. 

प्रश्‍न ः कोविड लसीकरणाच्या मोहीम कशी असेल? 
श्री. डुडी ः लसीकरणाबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सर्व तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 22 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाईल. यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातील दोन्ही कर्मचारी असतील. त्यासाठी प्रशिक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी आवश्‍यक लसींच्या रेफ्रिजरेशनची व्यवस्था आपल्याकडे आहे. कदाचित पुढच्या टप्प्यांसाठीच अतिरिक्त व्यवस्था उभी करावी लागेल. प्रत्येक लसीकरण केंद्रात एकावेळी तीसच लोक असतील. लसीकरणानंतर निरीक्षणाखाली ठेवण्यासाठीच्या व्यवस्था, जागांचे निश्‍चितीकरण अशी सारी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तीन टप्प्यांत यासाठीचा प्रशिक्षणाचा कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. त्याचा शासन प्रत्येक टप्प्यावर आढावाही घेत आहे. 

प्रश्‍न ः सर्वसामान्यांपर्यंत ही लस कधी पोहोचेल? 
श्री. डुडी ः हे तत्काळ सांगता येणार नाही. मात्र यासाठी टप्पे असतील. "माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी' या मोहिमेतून साठ वर्षांवरील विकारग्रस्त लोकांची माहिती उपलब्ध झाली आहे. असे लोक दुसऱ्या टप्प्यात येतील. हा खूप मोठा डाटा आपल्याला उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात 97 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात तितक्‍याच लोकसंख्येची आरोग्य तपासणी झाली.

त्यामुळे कोविडचे शिकार होऊ शकतील अशा सर्वांपर्यंत आपण पहिल्या टप्प्यातच पोचू शकतो. त्यातून पहिल्यांदा 1 लाख 28 हजार, तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख 1 हजार 543 वेगवेगळ्या विकारांनी ग्रस्त लोक आढळले. म्हणजेच या दोन लाख लोकांवर लक्ष दिले पाहिजे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना प्राधान्य असेल. 

प्रश्‍न ः या मोहिमेत पीएचसी सेंटर्सचा सहभाग कसा असेल? 
श्री. डुडी ः कोविडच्या काळात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यापुढच्या काळात ही अधिक सक्षम करण्यासाठी आमचे प्राधान्य असेल. कोविडच्या आधी "कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स'च्या 306 जागा भरण्यात आल्या होत्या. भविष्यात आणखी पन्नास ते साठ जागा भरल्या जातील. मनुष्यबळ तांत्रिक सुविधांच्या पातळीवर ही केंद्रे अधिक सक्षम केली जातील.

आरोग्य विभागाबरोबरच आमच्या आशा वर्कर्स या मोहिमेचा कणा असतील. त्यांनी व शिक्षकांनी कोविड काळात केलेले प्रचंड काम कौतुकास्पद आहे. येत्या काळात ही सर्वच यंत्रणा कोविडच्या लसीकरणाच्या मोहिमेत अग्रभागी असेल. ही मोहीम सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी होईल. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the first phase, 22,000 people in the health sector in Sangli district will be vaccinated