पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील 72 सहकारी संस्थांच्या  निवडणुका

घनशाम नवाथे 
Wednesday, 3 February 2021

जिल्ह्यातील 72 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दहा दिवसांत जाहीर होईल. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभासद संस्थांचे ठराव संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती देखील पुन्हा सुरू होणार आहे. 

सांगली : राज्यातील ज्या टप्प्यापासून सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या; त्या टप्प्यापासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार व पणन विभागाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 72 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दहा दिवसांत जाहीर होईल. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभासद संस्थांचे ठराव संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती देखील पुन्हा सुरू होणार आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे, तसेच विधानपरिषदेची निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक झाल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास काही दिवसांपूर्वी हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. या निवडणुका सहा टप्प्यांत घ्यावात अशा सूचना दिल्या होत्या.

18 जानेवारीपासून या निवडणुकांचा टप्पा सुरू होणार होता. जिल्ह्यात 1528 सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यांत घेण्याचे निश्‍चित होते. पहिल्या टप्प्यात 173 संस्था निश्‍चित होत्या. त्यापैकी 72 संस्थांची अंतिम मतदार यादी तयार असल्यामुळे त्यांची प्रक्रिया 18 जानेवारीपासून सुरू होणार होती. परंतु तेवढ्यात सहकार विभागाच्या सचिवांनी 31 मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. 

दरम्यान, विधानपरिषद, ग्रामपंचायत निवडणुका झाल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी पदाधिकाऱ्यांनी विनंती केली होती. ती विचारात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सहकार व पणन विभागाने निश्‍चित केले आहे.

त्यामुळे 16 जानेवारी रोजी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दिलेला आदेश रद्द केला असून, ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 173 पैकी 72 संस्थांची अंतिम मतदार यादी निश्‍चित असल्यामुळे दहा दिवसांत त्यांचा कार्यक्रम जाहीर होईल. 72 संस्थांमध्ये बहुतांश विकास सोसायट्यांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी यापूर्वी सदस्य संस्थांचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

25 जानेवारीपर्यंत ठराव संकलित केले जाणार होते. त्यामुळे आणखी नऊ दिवसांचा कालावधी देऊन ठराव संकलित करण्याची प्रक्रिया होणार आहे. ठराव संकलन झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the first phase, elections of 72 co-operative societies in Sangli district