तिने पहिला पगार दिला शेतकरी चळवळीला..!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

चळवळ टिकली पाहिजे', असे केवळ ओरडून चालत नाही. जमेल तिथे, जमेल तशी कृती करावी लागते. अशीच एक छोटी, पण महत्त्वाची कृती चळवळीतील कार्यकर्त्याच्या कारभारणीनं केली आहे.

सांगली : "चळवळ टिकली पाहिजे', असे केवळ ओरडून चालत नाही. जमेल तिथे, जमेल तशी कृती करावी लागते. अशीच एक छोटी, पण महत्त्वाची कृती चळवळीतील कार्यकर्त्याच्या कारभारणीनं केली आहे.

स्वप्नाली जाधव यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील नोकरीचा पहिला पगार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि पर्यायाने चळवळीला अर्पण केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे त्यांनी तो सुपूर्द केला.

चळवळीतील धडपड्या कार्यकर्ता भागवत जाधव यांची पत्नी स्वप्नाली यांची जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत निवड झाली. गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी नोकरी मिळवली. राजू शेट्टी यांच्या प्रत्येक चळवळीत सहभागी असणाऱ्या भागवत यांच्या कुटुंबासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण होता.

त्या सध्या बोरगाव (ता. वाळवा) येथे क्‍लार्क म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांचा पहिला पगार नुकताच हाती आला. तो आहे तसा त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हाती सुपूर्द केला. शिरोळ येथे श्री. शेट्टी यांच्या घरी जाऊन सत्कारही केला.

 

ही चळवळीला मदत नव्हे तर माझी एक कृतज्ञता भावना आहे, अशा शब्दांत स्वप्नाली यांनी भावना व्यक्त केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first salary paid to the raju shetti