esakal | 95 वर्षांत प्रथमच या व्याख्यानमालेची परंपरा खंडित
sakal

बोलून बातमी शोधा

For the first time in 95 years, the tradition of this lecture series is broken

मिरज विद्यार्थी संघाच्यावतीने प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यात होणारी वसंत व्याख्यानमाला यावर्षी कोरोना साथीमुळे लांबणीवर पडली आहे.

95 वर्षांत प्रथमच या व्याख्यानमालेची परंपरा खंडित

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज (जि. सांगली) : येथील मिरज विद्यार्थी संघाच्यावतीने प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यात होणारी वसंत व्याख्यानमाला यावर्षी कोरोना साथीमुळे लांबणीवर पडली आहे. 1925 मध्ये सुरू झालेल्या या व्याख्यानमालेस 95 वर्षांची परंपरा आहे. या परंपरेस यावर्षी प्रथमच खंड पडला. त्यामुळे व्याख्यानमालेचे पावसाळ्यानंतर फेर नियोजन करण्याचे संयोजकांचे प्रयत्न आहेत.

महाराष्ट्रातील सातत्य असलेल्या मोजक्‍या व्याख्यानमालांमध्ये मिरज विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमालेचा समावेश आहे. देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्तींच्या माहितीपूर्ण वक्तृत्वामुळे प्रसिद्ध असलेल्या या व्याख्यानमालेचे प्रत्येक वर्षी 1 मे ते 13 मे या कालावधीत आयोजन केले जाते. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ, अभ्यासक या व्याख्यानमालेत आपले विचार मांडत असतात. त्यामुळे ही व्याख्यानमाला म्हणजे मिरजकरांसाठी एक वैचारिक पर्वणी असते. विद्यार्थी संघाचे संचालक मंडळ गेली 95 वर्षे अव्याहतपणे या उपक्रमाचे नियोजन करते आहे.

या वर्षीच्या नियोजनात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन, पत्रकार श्रीराम सिद्धये, यांच्यासह अनेक दिग्गजांचे विचार श्रोत्यांना ऐकावयास मिळणार होते. याशिवाय ज्येष्ठ जुन्या पिढीतील ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या शिष्या बकुळ पंडित यांच्याही गायन आणि वसंतराव देशपांडे यांच्या बाबतच्या आठवणी सांगणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु यावर्षीचे सर्व नियोजन झाले असतानाच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आता नवरात्र किंवा दिवाळीदरम्यान फेरनियोजनाचा विचार संयोजकांकडून सुरू आहे. 

फेरनियोजन करण्याची तयारी

कोरोना साथीच्या अडचणीमुळे मे महिन्यातील रद्द झालेली व्याख्यानमाला नवरात्र अथवा दिवाळी दरम्यान आयोजित करण्याचा विद्यार्थी संघाच्या संचालक मंडळाचा मानस आहे. यासाठीचे फेरनियोजनही करण्याची तयारी संचालक मंडळाने ठेवली आहे. 
- माधव ताम्हणकर, कार्यवाह, मिरज विद्यार्थी संघ 

loading image