बेळगावात 50 वर्षांची शारदोत्सवाची परंपरा खंडित 

मिलिंद देसाई
Friday, 9 October 2020

दरवर्षी शारदोत्सवाची वाट पाहणाऱ्या महिलांना पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे.

बेळगाव : महिलांना हक्‍काचे व्यासपिठ उपलब्ध करुन देणाऱ्या शारदोत्सवात यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच  50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच शारदोत्सव रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. त्यामुळे दरवर्षी शारदोत्सवाची वाट पाहणाऱ्या महिलांना पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे.

 
महिलांनी पुढाकार घेत 20 जुलै 1971 मध्ये शारदोत्सव महिला सोसायटीची स्थापना केली. महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या शारदोत्सवात आतापर्यंत महाराष्ट्र आणि इतर भागातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली असुन पाच दिवस चालणाऱ्या शारदोत्सवात दरवर्षी व्याख्याने, नाट्‌यदर्शन, प्रसंग दर्शन, अभिनय दर्शन व संपुर्ण नाटक असे शारदोत्सवाचे स्वरुप आहे. त्यामुळे अनेक युवती व महिलांना शारदोत्सवाच्या माध्यमातुन आपली कला सादर करण्याची संधी मिळते. तसेच आतापर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी शारदोत्सवाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली असुन दरवर्षी शारदोत्सवातील कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे सादर होतील याकडे लक्ष दिले आहे.

हेही वाचा- आयुक्त झाले भावूक :  कोल्हापूरसारखे प्रेम कुठेच नाही! -

त्यामुळेच दरवर्षी दसरा जवळ येताच शहरातील महिलांना शारदोत्सवाचे वेध लागतात व आपली कला सादर करण्यासाठी त्यांचा सराव सुरु होतो. यावर्षी शारदोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय संयोजकातर्फे घेण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे यावेळी सर्व कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. मात्र परंपरा खंडीत होऊ नये यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शारदोत्सव कमिटीच्या अध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग यांच्या घरी मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन पाच दिवस दोन वेळा आरती करण्यात येणार आहे. यावेळी शारदोत्सव महिला सोसायटच्या पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

शारदोत्सवाचे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यावेळी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे कार्यक्रम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे सर्व कार्यक्रम पुढील वर्षी आयोजीत केले जाणार असुन परंपरेप्रमाणे देवीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. तसेच पाच दिवस दोन वेळा आरती कार्यक्रम आयोजीत केला जाणार आहे. 
प्रा. माधुरी शानभाग, अध्यक्ष. शारदोत्सव

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time in its 50-years history Sharadotsav canceled leaving the tradition to be broken by the corona