सांगली जिल्ह्यात खरीप पैसेवारी प्रथमच 50 पेक्षा जास्त

विष्णू मोहिते
Friday, 15 January 2021

सांगली जिल्ह्यातील 633 गावांची खरिप पीक पैसेवारी 50 पेक्षा जास्त आहे. यंदा जिल्हा प्रथमच टॅंकरमुक्त राहण्याची शक्‍यता आहे.

सांगली : जिल्ह्यातील 633 गावांची खरिप पीक पैसेवारी 50 पेक्षा जास्त आहे. यंदा जिल्हा प्रथमच टॅंकरमुक्त राहण्याची शक्‍यता आहे. एप्रिल, मेमध्ये जत तालुक्‍यातील काही गावांनाच टंचाईची झळ पोहचण्याचा अंदाज आहे. वीस वर्षांत प्रथमच जिल्ह्याची पैसेवारी 50 पैसेपेक्षा जास्त लागल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे आपत्तीत कोणत्याही शासकीय सुविधा मिळणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. 736 गावांपैकी अंतिम पीक पैसेवारी खरीप हंगामातील 633 गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. जत तालुक्‍यातील 123 पैकी 69, आटपाडी तालुक्‍यातील 60 पैकी 34 अशा 103 रब्बी गावांची पैसेवारी जाहीर केलेली नाही. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस, कडेगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्‍यातील सर्व गावांची पीक पैसेवारी 50 पैसेपेक्षा जास्त आहे. वीस वर्षांत प्रथमच जिल्ह्याची पैसेवारी 50 पेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. 

पीक पैसेवारी जास्त असल्याने प्रशासनाचा टॅंकरवरील लाखोंच्या खर्च वाचणार आहे. टंचाईच्या उपाययोजनाही राबवता येणार नाहीत. जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील काही गावांत सिंचन योजनांचे पाणी गेले नाही. तेथे पाऊसही कमी पडतो, त्या ठिकाणी एप्रिल, मे महिन्यात टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

यांना मिळतो लाभ 
दुष्काळग्रस्त ठरवण्यासाठी 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना दुष्काळग्रस्तांसाठीच्या उपाययोजनांचा लाभ देण्यात येतो. भरपाईच्या दरात राज्यानेही वाढ केली आहे. कोरडवाहू शेतीसाठी 4 हजार 500 रुपयांवरून 6 हजार 800 रुपये, बागायतीसाठी 9 हजार रुपयांवरून 13 हजार 500 रुपये आणि फळबागांसाठी 12 हजार रुपयांवरून 18 हजार रुपये भरपाई दिली जाते. 

तालुकानिहाय पैसेवारी 

 • वाळवा- 98
 • शिराळा- 95 
 • मिरज- 72 
 • तासगाव- 69 
 • खानापूर- 68 
 • कवठेमहांकाळ - 60 
 • कडेगाव- 56 
 • जत- 54 
 • पलूस - 35 
 • आटपाडी- 26

संपादन : युवराज यादव


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: For the first time in Sangli district, kharif percentage is more than 50