
कृष्णा नदीला 15 वर्षापुर्वी आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यातील पाच बोटी गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगली : कृष्णा नदीला 15 वर्षापुर्वी आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यातील पाच बोटी गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नगरसेवक गजानन मगदूम यांनी आज स्थायीत हा विषय उपस्थित करुन, बोटी चोरीला गेल्या, की आपत्ती व्यवस्थापनाकडील कर्मचाऱ्यांनी परस्परच विकल्या ? असा सवाल करून शोध घेण्याची मागणी केली. सभापती पांडुरंग कोरे यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
गजानन मगदूम म्हणाले,""कृष्णा नदीला सन 2005-06 मध्ये महापूर आला होता. त्यावेळी महापालिकेकडे यांत्रिकी बोटी नसल्याने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे त्यावेळी शासनानेच महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. गेल्या वर्षी 2019 मध्ये पुन्हा महापूर आला. तेंव्हाही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बोटींची कमरतता दिसून आली. त्यामुळे प्रशासनाने नव्याने बोटी खरेदीचा विषय स्थायी समितीसमोर पाठविला होता.
नवीन बोटी खरेदीसाठी माहिती घेताना 15 वर्षापुर्वी महापुरानंतर शासनाने दिलेल्या सहा बोटींपैकी पाच बोटी गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अग्निशमन विभागाकडे माहिती विचारली असता अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्थायी समिती सभेत याची चौकशीची मागणी केल्याचे मगदूम यांनी सांगितले.
स्थायी सभा उधळून लावू
श्री. मगदूम म्हणाले,""शासनाने दिलेल्या सहापैकी पाच बोटी अग्निशमन विभागाकडील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून विकल्याचे समजते. अधिकारी, कर्मचारीच महापालिकेच्या मालमत्तेवर डल्ला मारत आहेत. आठ दिवसात चौकशी करून संबंधितावर फौजदारी दाखल न झाल्यास स्थायी सभा उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिला.
संपादन : प्रफुल्ल सुतार