कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारास पाच तास विलंब

बलराज पवार
Thursday, 30 July 2020

सांगली-  मिरज - पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात कर्मचाऱ्यांअभावी तब्बल पाच तास विलंब झाला. अवघे पाच कर्मचारी या ठिकाणी आहेत. त्यातच अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. या ठिकाणी तात्काळ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नगरसेवक अभिजित भोसले यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली. 

काल (मंगळवारी) सकाळी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजता मृतदेह मिरज - पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणला. तेथे नातेवाईकही पोहोचले. पण तब्बल पाच तास झाले तरी अंत्यसंस्कारास कर्मचारी टाळाटाळ करीत होते. त्याची माहिती भोसले यांना समजली. ते स्मशानभूमीत गेले. कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी वस्तूस्थिती समजली. 

श्री. भोसले म्हणाले,""स्मशानभूमीत पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 24 तास काम करावे लागते. सुरक्षेसाठी पीपीई किट दिले आहे. मात्र ते किट सतत घालून राहिल्याने त्रास होतो. श्वास घेण्यासाठी दर 10 ते 15 मिनिटाला फेस गार्ड काढावा लागतो. कर्मचाऱ्यांऱ्यासाठी स्वच्छतागृहांची सोय नाही. घरी जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी स्नानगृह नाही. अंत्यसंस्कार केल्यावर दुसऱ्यादिवशी रक्षा साफ करण्याचे कामही त्यांना करावे लागते. त्यांच्यावर कामाचा ताण आहे.'' 

ते म्हणाले,""आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार केली. अंत्यसंस्कारासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. त्यांना तीन शिफ्टमध्ये काम द्यावे, स्मशानभूमीत दहन कट्टे वाढवावेत, चांगल्या दर्जाचे पीपीई किट द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. पण जोपर्यत कर्मचाऱ्यांना सोयी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा करणार आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hours delay in cremation of persons who died by corona