सांगली : सरपंचासह पाचजण तीन जिल्ह्यातून तडीपार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

  • कोंत्याव बोबलादचे सरपंच व सराईत गुन्हेगार नंदकुमार भिवा करे याच्यासह पाच जणांच्या टोळीला सांगलीसह सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतून वर्षासाठी तडीपार
  • या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे
  • कारवाई झालेल्यांमध्ये  नंदकुमार भिवा करे (वय २९) याच्यासह शिवाजी भिवा करे (वय ३०), अप्पासाहेब उर्फ अप्पा लिंबाजी लोखंडे (४४), गोरख लिंबाजी लोखंडे (वय ३९), बबन रामा करे (वय ३९, सर्व रा. कोंत्याव बोबलाद) आदींचा समावेश.

उमदी - कोंत्याव बोबलादचे सरपंच व सराईत गुन्हेगार नंदकुमार भिवा करे याच्यासह पाच जणांच्या टोळीला सांगलीसह सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतून वर्षासाठी तडीपार करण्यात आले. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी ही कारवाई केली. नंदकुमार भिवा करे (वय २९) याच्यासह शिवाजी भिवा करे (वय ३०), अप्पासाहेब उर्फ अप्पा लिंबाजी लोखंडे (४४), गोरख लिंबाजी लोखंडे (वय ३९), बबन रामा करे (वय ३९, सर्व रा. कोंत्याव बोबलाद) आदींचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी - नंदकुमार करे सरपंच असून त्याच्या नेतृत्वाखाली त्याचा भाऊ शिवाजी करे या टोळीचे नेतृत्व करत होता. या टोळीविरुद्ध उमदी पोलिस ठाण्यात २००२ पासून खून, खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी दुखापत करणे, दरोडा, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, शासकीय नियमांचे उल्लंघन असे गंभीर गुन्हे दाखल होते. न्यायालयातून जामिनावर मुक्तता झाल्यानंतरही टोळीचे कृत्य कायम होते. त्यामुळे उमदी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. नंदकुमार सरपंच असल्याने राजकीय क्षेत्रात पुढाकार घेत असतो. टोळीतील सर्वजण एकमेकांचे चुलत भाऊ व नातलग आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी  वाढली होती. 

त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक शर्मा यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देत कारवाईचा बडगा उगारला. अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सिद्धाप्पा रूपनर, विशाल भिसे, दीपक गट्टे यांचा ही कारवाई करण्यात सहभाग होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five peoples including Sarpanch Cross over from Three district