आरोग्य यंत्रणेचा कंटेनमेंट झोन बाहेर ऍन्टीजेन चाचण्यांचा सपाटा 

जयसिंग कुंभार
Wednesday, 5 August 2020

कंटेनमेंट झोनच्या बाहेर ऍन्टीजेन चाचण्यांना विरोध सुरु झाल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने शिल्लक किटचा फडशा पाडण्यासाठी औद्योगिक वसाहतींतील कामगारांच्या चाचण्या झाल्या.

सांगली : कंटेनमेंट झोनच्या बाहेर ऍन्टीजेन चाचण्यांना विरोध सुरु झाल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने शिल्लक किटचा फडशा पाडण्यासाठी औद्योगिक वसाहतींतील कामगारांच्या चाचण्या झाल्या. अर्थात या चाचण्या ऐच्छिक असल्याचे उद्योजकांना सांगण्यात आले तथापि तीनशेंवर चाचण्या काल एका दिवसात करण्यात आल्या. 

ऍन्टीजेन चाचण्यांच्या निष्कर्षांबाबत प्रारंभपासूनच साशंकता आहे. या चाचण्यांची अचुकता साठ टक्के इतकीच आहे. त्यामुळे तत्काळ निदानासाठी ऍन्टी बॉडी चाचण्या कराव्यात अशी शिफारस आहेत. तथापि महापालिकेने ऍन्टीजेन चाचण्यांची किट खरेदी केली आहे. मुळात या चाचण्या कंटेनमेंट झोनमध्येच कराव्यात असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने आधीच स्पष्ट केले आहे. महापालिकेने शहरात सरसकट चाचण्या सुरु केल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 
दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी पत्रक प्रसिध्द करून या चाचण्या कोठे कराव्यात याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये पहिलाच मुद्दा कंटेनमेंट झोनमध्येच चाचण्या कराव्यात असे म्हटले आहे. शनिवारीच हे पत्र प्रसिध्द केले आहे मात्र महापालिकेने या पत्राची कोणतीही दखल न घेता कंटेनमेंट बाहेर चाचण्यांचा सपाटा कायमच ठेवला आहे. 

साळुंखे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रात अन्यही महत्वाच्या सूचना आहेत. पन्नास वर्षावरील, ह्‌दयविकार, फुफुस, मुत्रपिंड, यकृत, मधुमेह, रक्तदाब असे विकारग्रस्त, कर्करोग ग्रस्त साठ वर्षावरील वयोवृध्द, गरोदर महिला यांच्याच चाचण्या कराव्यात असे या पत्रात म्हटले आहे. या चाचण्यांचा वापर करण्यापुर्वी "आयसीएमआर'कडे रजिस्ट्रेशन करणे, घेतलेल्या प्रत्येक चाचणीची नोंदणी व निष्कर्ष आयसीएमआर पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. महापालिका प्रशासनाने यातल्या किती बाबींची पुर्तता केली याचा खुलासा झाला नाही. 

एकीकडे उपचाराविना रुग्णांचे हाल होत असताना महापालिकेची यंत्रणा मात्र या अनावश्‍यक चाचण्यांमध्येच गुंतली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णांचा आरटी पीसीआर चाचणी करणे बंधणकारक आहे. ते मात्र केले जात नाही. महापालिकेने कृष्णा व्हॅलीमध्ये झालेल्या शिबिरातील निगेटीव्ह आलेल्या रुग्णांबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या शिबिराचा हेतूच स्पष्ट झालेला नाही. 

याबाबत कृपवाड औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सतीश मालू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,"" महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कामगारांच्या सुरक्षेसाठी चाचण्या घेत असल्याचे सांगितले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून कामगारांच्या चाचण्या कराव्यात अशी विनंती करण्यात आली. तथापि अशा चाचण्यांची गरजच नसल्याचे आम्हाला आजच समजले.'' 

किट खरेदी जादा दराने 
स्थायीचे सदस्य गजानन मगदूम म्हणाले,"" महापालिकेने एकूण 55 लाख 31 हजार 400 रुपयांची किट विनानिविदा खरेदी केली आहेत. एसडी बायोसेन्सर या कंपनीच्या प्रति किटची खरेदी किंमत 504 रुपये इतकी आहे. इंडिया मार्टवर याच किटची ऑनलाईन किंमत 375 रुपये आहे. स्थायीसमोरच्या विषयपत्रात एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या टेस्ट किटस्‌ना "आयसीएमआर'ने मान्यता दिल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात अशी किट पुरवणाऱ्या अनेक मान्यताप्राप्त कंपन्या आहेत. खुद्द बायोसेन्सर कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधीने पाचशेपेक्षा अधिक किटची खरेदी केल्यास दरात आणखी सवलत देऊ असे सांगितले. आपत्तीचा काळ असला तरीही यापुढे तरी आयुक्तांनी योग्य स्पर्धात्मक दरात खरेदी करून महापालिकेचे हित पहावे.'' 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flattening of antigen tests outside