मिरज-सलगरे राज्यमार्गावरील ओढ्याला आलेल्या पुरात महिला गेली वाहून

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

मल्लेवाडी ओढ्यातून महिला गेली वाहून पती व अन्य एकाला वाचवण्यात तरुणांना यश 

सांगली : मिरज-सलगरे राज्यमार्गावरील मल्लेवाडी ओढ्याला आलेल्या पुरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जयश्री संजय दुरुरे (वय 40, मल्लेवाडी, दर्गा परिसर) ही महिला वाहून गेली. तिचा पती संजय धनपाल दरुरे (वय 48) व धोंडिराम लालासाहेब शिंदे (वय 62) या दोघांना वाचवण्यात स्थानिक तरुणांना यश आले.

 
याबाबतची अधिक माहिती अशी 

राज्यमार्गावरील हा ओढा कालच्या पावसाने धो धो वाहत आहे. काल रात्री दरुरे दांम्पत्य मालगावला नातलगांतकडे दुचाकीने गेले होते. रात्री ओढ्याला पाणी आल्याने त्यांनी ओढ्याच्या अलीकडेच एकाकडे मुक्काम केला. आज सकाळी ते पुन्हा गावात येण्यासाठी ओढ्याच्या काठावर येऊन बसले होते. तास दोन तास त्यांनी पाणी कमी होईल या आशेने वाट पाहिली. शेवटी पाणी कमी होत नाही म्हणून  पाण्यातून जायचा निर्णय घेतला.

पुलावर सुमारे तीन साडेतीन फुट पाणी होते. पाण्याला मोठा वेग असल्याने तीघेही वाहून जाऊ लागले. हा प्रकार ओढ्याच्या पलीकडे असलेल्या निलेश जकाते, लखन करपे, दिपक करपे, सनी जकाते यांनी पाहिला. त्यांनी पाण्यात येत तिघांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. धोंडिराम, संजय यांना वाचवण्यात त्यांना यश आले. जयश्री पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह गावातील यल्लमादेवी मंदिराजवळील झुडपात सापडला. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood near Mallewadi stream on Miraj-Salgare state highway woman was carried away.

Tags
टॉपिकस
Topic Tags: