पंचगंगा मच्छिंद्रीच्या दिशेने (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पंचगंगा नदीने आज धोक्‍याची पातळी ओलांडली असून, शिवाजी पुलावर मच्छिंद्री होण्याची शक्‍यता आहे. रात्री नऊला पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फूट ५ इंच होती. मच्छिंद्री झाल्यानंतर शहरात महापूर आल्याचे मानले जाते.

कोल्हापूर - पंचगंगा नदीने आज धोक्‍याची पातळी ओलांडली असून, शिवाजी पुलावर मच्छिंद्री होण्याची शक्‍यता आहे. रात्री नऊला पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फूट ५ इंच होती. मच्छिंद्री झाल्यानंतर शहरात महापूर आल्याचे मानले जाते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सात एसटी मार्ग बंद आहेत. पूरस्थितीमुळे शहरात येणारी भाजीपाला आवक घटली आहे.

प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती कायम आहे. प्रयाग चिखलीच्या मुख्य रस्त्यावर पाणी वाढल्याने गावास बेटाचे स्वरूप आले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडीजवळील रेडे डोह फुटून महामार्गावरून पाणी 
वाहत आहे.

दरम्यान, प्रशासनाने पुनर्वसनासह अन्य पर्यायी व्यवस्थेचे नियोजन केले आहे. सध्या आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे येथील पोवार पाणंद, कसबा बावडा ते शिये रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे शहरात येणारे जवळचे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. आज मच्छिंद्री होईल म्हणून कोल्हापूकरांनी पंचगंगा नदीवर गर्दी केली होती. पंचगंगेच्या जुन्या पुलाजवळील कमानीची उंची पूर्ण गाठल्यानंतर मच्छिंद्री झाल्याचे म्हटले जाते. मच्छिंद्र होते; तेंव्हा पुराचे पाणी शहरात येण्याची दाट शक्‍यता असते. शहरातील व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी कुंभार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जयंती नाला, खानविलकर पेट्रोल पंप आदी परिसरात पाणी येते. आज पुराचे पाणी धोक्‍याच्या पातळीवर असल्यामुळे पंचगंगा घाट, शिवाजी पूल, पिकनिक पॉईंट, संजय गांधी पुतळा परिसरात पूर पाहण्यासाठी गर्दी झाली होती. तेथे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

गेल्या दहा बारा दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी शेती मालाची आवक घटली आहे. शाहू मार्केट यार्डामध्ये दररोज १० ते २० गाड्यांनी आवक कमी होत आहे. यात शिरोळ तालुका तसेच चिक्‍कोडी तालुक्‍यातून येणारा भाजीपाल्याची आवक कमी आहे. कांदा- बटाटा बाजारातील आवकही  कमी झाली आहे. अन्य तालुक्‍यातून भाजीपाला येतो. कोकणातही पूर स्थिती तिकडे जाणाऱ्या भाजीपाल्याची जावक घटली आहे.

सात मार्गांवर एसटी बंद
० अतिवृष्टीमुळे सात मार्गांवर एसटी मार्ग बंद ः विभाग नियंत्रक रोहन पलंगे 
० संभाजीनगर-बाचणी, गडहिंग्लज -नांगनूर, गारगोटी किल्ला -मूरगुड मार्ग, चंदगड- दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड,  गगनबावडा-कोल्हापूर आणि आजरा-चंदगड मार्ग पूर्णत: बंद
० कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर शिवाजी पुल ते केर्ली येथे पाणी आल्याने राधानगरीमार्गे वाहतूक सुरू. 
० इचलकरंजी- कागल- रेंदाळ मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने बोरगाव मार्गे वाहतुक सुरू
० मलकापूर-गावडी अंशत: बंद; कागल-बस्तवडे -बाणगे मार्गावर पाणी असल्याने पर्यायी मुरगूड -अनूर मार्गे एसटी वाहतूक सुरू

शिये रस्ता पाण्याखाली
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी कसबा बावडा येथील उलपे मळा येथे जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. सध्या कसबा बावडा ते शिये रस्त्यावर सुमारे अडीच-तीन फुटांचे पाणी आहे.

धरणातील साठा ‘टीएमसी’मध्ये
० राधानगरी- ८.२९
० कोयना- ७८.२९
० अल्लमट्टी- १०५.८७
० तुळशी- २.७७, वारणा- ३०.०८, 
० दूधगंगा- १६.७९, कासारी- २.४०, 
० कडवी- २.५२, कुंभी- २.३७, 
० पाटगाव- ३.०९, चिकोत्रा- १.०३, 
० चित्री- १.७१, जंगमहट्टी- १.२२, 
० घटप्रभा- १.५६, जांबरे- ०.८२, कोदे (ल. पा.) ०.२१४

बंधाऱ्यांची पाणीपातळी (फुटांत)
राजाराम ४१.६, सुर्वे ३९, रुई ६९.६, इचलकरंजी ६५, तेरवाड ५६.६, शिरोळ ५८, नृसिंहवाडी ५८, राजापूर ४५, 
सांगली कृष्णेवरील आयर्विन पूल- ३७.६ आणि अंकली पूल ३६.७ (सकाळी आठला नोंदवलेली आकडेवारी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood situation in Kolhapur panchaganga