सांगलीत महापुराचा विळखा सैल; काही भागात पाणी ओसरले

बलराज पवार
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

महापुराचा विळखा सेल होत असला तरी आता नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अद्यापही हजारो जण पुराच्या वेढ्यात अडकले आहेतच. त्यांना बाहेर काढण्याबरोबरच त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी 76 बोटीद्वारे मदत कार्य जोरात सुरू आहे. एन डी आर एफ लष्कर तसेच प्रशासन मदत कार्यात 24 तास सतर्क आहे.

सांगली : शहरात शुक्रवार दुपारपासून पूर पातळी कमी होऊ लागली आहे. आज सकाळी शहरातील काही भागात पाणी उतरले असल्याचे लक्षात येऊ लागले आहे. गेल्या सात तासात अर्धा फूट पूर्  ओसरला आहे. सकाळी सहा वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 56 फूट सहा इंच इतकी होती. जिल्ह्यातही अनेक गावातील पाणी पातळी कमी झाले आहे पूर ओसरू लागल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.

सांगली जिल्ह्याला पडलेला कृष्णेच्या महापुराचा विळखा आता सैल होऊ लागला आहे. कोयना धरणातून होणारा विसर्ग 77 हजार क्युसेक्स प्रति सेकंद इतका सुरू आहे. तर अलमट्टी धरणातून होणारा विसरत नाही चार लाखाहून अधिक आहे. तसेच चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग बारा हजारपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आज दुपारनंतर पाणी पातळी आणखी वेगाने उतरण्याची शक्यता आहे.

शहरातील हिराबाग कॉर्नर, स्टेशन चौक, सराफ कट्टा, शंभर फुटी या भागात पुराचे पाणी थोडे मागे सरल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

महापुराचा विळखा सेल होत असला तरी आता नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अद्यापही हजारो जण पुराच्या वेढ्यात अडकले आहेतच. त्यांना बाहेर काढण्याबरोबरच त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी 76 बोटीद्वारे मदत कार्य जोरात सुरू आहे. एन डी आर एफ लष्कर तसेच प्रशासन मदत कार्यात 24 तास सतर्क आहे.

पूरग्रस्तांच्या मदत कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने विधानपरिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सांगली महापालिकेचे आयुक्त म्हणून नुकतेच काम केल्यामुळे त्यांना शहराची संपूर्ण माहिती आहे. शिवाय 2005 साली आलेल्या महापुरा वेळीही ते सांगलीत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त केले आहे.

महापुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी धुळे लातूर आदी जिल्ह्यांमधून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी पाचारण करण्यात आले आहेत. महापुरात अडकलेल्या सुमारे दीड लाखाहून अधिक पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना विविध निवारा केंद्रात आसरा देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood situation in Sangli now reduced