महाबळेश्‍वर, पाचगणीतील रानफुले ठरत आहेत अभ्यासकांसाठी पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

फुलांच्या पठारावर अभ्यास शाळा भरू लागली आहे. 

भिलार : महाबळेश्वर तालुक्‍यात यंदा मुक्त हस्ते कोसळलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. रानफुलांचे ताटवे डोंगर पठारांवर फुलल्याने पर्यटक, विद्यार्थी तसेच वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. 

नियमित अशा गुलाबी तेरडा, पिवळा मिकी माउस, निळी सितेची आसव, पांढरे गेंद, गुलछडी, सोनकी, निसुर्डी, नभाळी, पांडा, श्वेतांबरा या फुलांचे गुच्छच्या गुच्छ दिसत असल्याने डोंगररांगा कलरफुल भासत आहेत. याबरोबरच दुर्मिळ होणाऱ्या औषधी वनस्पतीही दिसू लागल्या आहेत. रानोमाळ भटकंती करताना रानफुले, वनस्पतींच्या मनमोहक सुगंधाने निसर्गप्रेमी हरखून जात आहेत. निसर्गाचा हा खजिना डोळ्यात साठविण्यासाठी विविध भागातील अभ्यासक आणि पर्यटकांची गर्दी होत आहे.
 
निसर्गसंपदा आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या पाचगणीला या विविधांगी फुलांमुळे, औषधी वनस्पतींमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्‍याच्या पर्वतरांगांमधून विविध प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती नेहमीच दिसून येतात. काही वनस्पती आणि दुर्मिळ औषधी झाडेझुडपे लुप्त होत चालली असतानाही, या डोंगररांगेत दरवर्षी विविध रंगी तेरडा, सोनकी, मिकी माउस रानफुलांसह औषधी वनस्पतींचा जणू काही खजिनाच निसर्गाने ठेवला आहे. 

यावर्षी या निसर्ग खजिन्यात गावठी वनस्पती आणि वनौषधीमध्ये तिरडा, हिरडा, बेहडा, बेल, चिचुरटी, फालगम, अंजनी, भुरणी दिसून येत आहेत. फुलांमध्ये "लॅमिऍसी' कुळातील रानतुळसही पाहायला मिळत आहे. पानवेल, देव केवडा, सकरोबा, सोनकी, पिवळी विळवण आदी रानफुलांचाही त्यात समावेश आहे. 
फुलझाडांचेही दर्शन होत असल्याने निसर्गप्रेमींची पावले आवर्जून या भागाकडे पडत आहेत. 

तापोळा, तळदेव, जावळी, महाबळेश्‍वरच्या डोंगररांगा, तसेच पाचगणीचे टेबललॅंड, राजपुरी, भिलार, खिंगर, दांडेघर, गोडवलीचे टेबल टॉपवर निसर्गाने मनसोक्त उधळण केली आहे. कास पठाराप्रमाणेच विविध प्रकारची रानफुले येथील सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या सौंदर्यात भर घालत आहेत. या पठारांवर शाळांच्या सहली येत असून फुलांची अशी उधळण करणारी ठिकाणे जपणूक करून या ठिकाणी फुले येण्याच्या काळात योग्य मार्गदर्शन करून त्या ठिकाणी पर्यटक व सहली नेण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केल्यास या रंगीबेरंगी डोंगररांगा फुलोत्सवाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर जातील. 

केंद्र शासनाने नव्याने तयार केलेल्या आयुष आणि पर्यटन विभागाने महाबळेश्वर तालुक्‍यातील दुर्मिळ वनस्पती, वनौषधी आणि रानफुले यांचा खजिना जतन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. तसेच ही ठिकाणे लोकांसमोर जाणे, ही काळाची गरज आहे.

- तेजस्विनी भिलारे, मुख्याध्यापिका, एम. आर. भिलारे हायस्कूल, राजपुरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers from mahabaleshwar are studying by students