चातुर्मास पाळा; पण हे नियम पाळा; यांनी केले आहे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

यंदाचा चातुर्मास उद्या (ता. 28) रविवारपासून सुरु होत आहे. धर्मसाधनेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा कालावधी असतो

सांगली : यंदाचा चातुर्मास उद्या (ता. 28) रविवारपासून सुरु होत आहे. धर्मसाधनेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा कालावधी असतो. परंतू कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे सरकारने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन सर्व नियम पाळून या चातुर्मासातील सर्व धार्मिक उपासना, कार्यक्रम घरच्या घरी स्थानिक पंडितांच्या मार्गदर्शनानुसार करावेत असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले आहे. 

रावसाहेब पाटील म्हणाले, जैन धर्मात चातुर्मासाला मोठे धार्मिक महत्व आहे. या काळात विविध पुजा विधाने, अष्टान्हिक पर्व, नोपी, पर्युषण पर्व, स्वाध्यायादी नियमित केले जातात. यासाठी मंदिरांच्या माध्यमातून लोक एकत्र येत असतात. परंतू, या वर्षी कोरोनामुळे अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे भगवान महावीर जयंतीही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने गर्दी टाळण्याचे केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन घरच्या घरी केली होती. तसेच चातुर्मास काळातही मंदीर दर्शन किंवा अभिषेक आदीसाठी आग्रह न धरता शासनाच्या नियमांचे पालन करत आत्मसाधना करावी. घरीही सर्व नियमांचे पालन करत दिनचर्या करावी असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow Chaturmas; But follow these rules; This meeting has made an appeal