esakal | नियमांचे पालन करा; प्रतिबंधात्मक लस घ्या... 

बोलून बातमी शोधा

Follow the rules; Get a preventive vaccine ...

सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पलूस तालुक्‍यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दक्षपणे काम करीत आहे. नागरिकांनी शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनांचे पालन करावे.

नियमांचे पालन करा; प्रतिबंधात्मक लस घ्या... 

sakal_logo
By
संजय गणेशकर

पलूस : सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पलूस तालुक्‍यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दक्षपणे काम करीत आहे. नागरिकांनी शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी त्वरित कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन कृषी व सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले. 

पलूस येथे तालुक्‍यातील कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मंत्री डॉ. कदम बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, खाशाबा दळवी, जितेश कदम, वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, हृषीकेश लाड व सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. कदम म्हणाले,""राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊनचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेतला जाणार आहे. पलूस तालुक्‍यातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी महसूल, आरोग्य, पोलिस व इतर प्रशासन दक्षपणे काम करीत आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. 

पलूस व कडेगाव तालुक्‍यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. पलूस तालुक्‍यात 10 व कडेगाव तालुक्‍यात 14 कोरोना अशी एकूण 24 लसीकरण केंद्रातून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 30 ते 35 टक्के लसीकरण झालेले आहे. नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले. शासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला तरी शासन व्यापारी, दुकानदार यांच्या बाबतीत सकारात्मक विचार करत आहे. कोरोनाचे परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. असे डॉ. कदम यांनी सांगितले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

पलूस पाणी योजनेसाठी पाठपुरावा 
पलूस शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर आहे. त्यासाठी माझ्यासह पलूस नगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक पाठपुरावा करीत आहेत. सध्या राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे थोडा विलंब होत आहे, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले. 


संपादन : प्रफुल्ल सुतार