"लॉकडाउन' तोडून या गावात आला परदेशी पाहुणा... 

foreign bird.jpeg
foreign bird.jpeg

कामेरी (सांगली)- वाळवा तालुक्‍यातील शिवपुरी येथील पुरातन काळातील सिध्देश्वर मंदिराजवळ असणाऱ्या तलावात "स्टॉर्क' या परदेशी पक्षांचे आगमन झाले आहे. आपल्याकडे चित्रबलाक तर विर्दभात त्यांना "चाम ढोक' असे म्हणतात. हे पक्षी मंदीर परिसरात असणाऱ्या तलावाजवळ मोठ्या संख्येने दिसून लागलेत. "कोरोना' मुळे "लॉकडाऊन' आणि संचारबंदीमुळे नागरिक घरात अडकून बसले आहेत. परंतू पक्षांना कसली आलीय चिंता..त्यांनी थेट परदेशातून येथवर भरारी मारली आहे. 

सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा राहिला तर त्याची उंची 95-100 सें. मी. भरते. तर उडताना पंखांच्या बाजूने लांबी 150-160 सेंटीमीटर इतकी भरते. चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा असतो. त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खातो. 
चित्रबलाकचा वीण काळ साधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी असून हा पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर गवत, काड्या वगैरे वापरून मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसऱ्याचे घरटे बांधले जाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर बगळे आणि करकोचे आपापली घरटी दाटीने बांधतात. यामुळे तेथे एक मोठी वसाहत निर्माण होते.

मादी चित्रबलाक फिकट पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली 2 ते 5 अंडी देते. नर-मादी घरटे बांधण्यापासून, पिलांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे मिळून करतात. पूर्व विदर्भात स्टॉर्कला चाम ढोक असे म्हणतात. शिवपुरी भागात या परदेशी पाहुण्याच्या आगमनाने परिसरातील पक्षी प्रेमी व प्राणीमित्रांना त्यांना पाहण्यात उत्साह निर्माण झाला आहे. मात्र कोरोनामुळे "लॉकडाऊन' आणि संचारबंदी असल्यामुळे पक्षी शौकीनांची निराशा झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com