इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

शांत व निगर्वी व्यक्तीमत्वांच्या भाऊंचा शहरात मोठा चाहता वर्ग राहिला.

इस्लामपूर (सांगली)  ः शहराचे नगराध्यक्षपद तीनवेळा भुषवलेले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयराव गणपतराव पाटील तथा विजयभाऊ (वय 72) यांचे आज दुपारी निधन झाले. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंझ सुरू होती. मितभाषी, शांत व निगर्वी व्यक्तीमत्वांच्या भाऊंचा शहरात मोठा चाहता वर्ग राहिला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा संदीप, मुलगी, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या तालमीतील कार्यकर्ते असलेल्या विजयभाऊंनी पुढे इस्लामपूरच्या राजकारणात मंत्री जयंत पाटील यांना अखंड साथ दिली. 1974 मध्ये ते सक्रिय राजकारणात आले. 1985 ला नागरिक संघटनेच्या माध्यमातून ते पालिकेत गेले. 1988 ला पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. 88 ते जून 90 , मे 94 ते डिसेंबर 96 या दोन टर्मनंतर फेब्रुवारी 2001 ते डिसेंबर 2006 या कालावधीत ते थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द झाली.

या त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक विकासात मोलाचे योगदान राहिले. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत शहराला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक त्यांच्या काळात मिळाले. राजकारणाबरोबरच शहरातील विविध आर्थिक संस्थांमधून त्यांनी लोकांना बळ दिले. राजारामबापू नाट्यगृह, खुले नाट्यगृह, शिवाजी महाराजांचा पुतळा, अनेक शॉपिंग सेंटर्स, अग्नीशमन केंद्र, कृषी उद्यान, अंबिका व कुसुमगंध उद्यान, घरकुल योजना ही त्यांच्या काळातील अनेक कामे त्यांच्या काळात झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Mayor of Islampur Vijaybhau Patil passes away