Sangli : तब्बल 37 वर्षांनी सत्तांतर; भाजपच्या माघारीने माणगंगा कारखाना शिवसेनेच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manganga Sugar Factory Election

माणगंगा साखर कारखान्याच्या स्थापनेपासून ३७ वर्षांनी ऐतिहासिक सत्तांतर झाले. कारखान्यावर मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आली.

Sangli : तब्बल 37 वर्षांनी सत्तांतर; भाजपच्या माघारीने माणगंगा कारखाना शिवसेनेच्या ताब्यात

आटपाडी : येथील बंद असलेल्या माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतून (Manganga Sugar Factory Election) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी माजी आमदार राजेंद्र देशमुख (Rajendra Deshmukh) यांनी आश्चर्यकारक सर्वच उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाचे १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले. देशमुख गटाने अनपेक्षितरीत्या उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

येथील माणगंगा साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. सत्ताधारी माजी आमदार राजेंद्र देशमुख गटाने व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाने परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. १८ जागांसाठी ७६ उमेदवारी अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिले. निवडणूक बिनविरोधसाठी वरिष्ठ पातळीवरून बरेच प्रयत्न झाले. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील गट सर्व उमेदवारी अर्ज मागे घेईल, अशी चर्चा होती.

मात्र, पाटील यांनी बिनविरोधला प्रतिसाद न देता निवडणूक लढण्याचा निर्धार जाहीर केला. काल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. देशमुख गटाचे कार्यकर्ते बाबासाहेब देशमुख सूतगिरणी कार्यस्थळी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते, तर तानाजीराव पाटील गटाचे कार्यकर्ते त्यांच्या महाविद्यालयावर एकत्रित आले होते. संपूर्ण तालुक्याचे या दोन्ही गटांच्या हालचाली व निर्णयाकडे लक्ष होते.

अर्ज माघारीच्या पंधरा मिनिटे आधी देशमुख गटातून उमेदवारी दाखल केलेले सांगोला तालुक्यातील पाच उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतले. त्यानंतर माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर राजेंद्र देशमुख यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांना व उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयाने कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.

मात्र देशमुख यांनी, विरोधकांनी कारखाना जरूर चालवावा, त्यांना कारखानदारीसमोरील प्रश्न व अडचणी समजतील. त्यांनी कारखाना सुरू करावा, यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात जाऊन सर्वच उमेदवारी अर्ज माघारी घेतले. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज निश्चित करून उर्वरित मागे घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे १८ अर्ज शिल्लक ठेवून इतर सर्व अर्ज दुपारी तीनपर्यंत मागे घेतले.

माणगंगा साखर कारखान्याच्या स्थापनेपासून ३७ वर्षांनी ऐतिहासिक सत्तांतर झाले. कारखान्यावर मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आली. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर तानाजीराव पाटील यांनी बाजार समितीवर सत्ता मिळवली होती. त्यानंतर कारखान्यावर सत्ता मिळवून देशमुख गटाला तिसरा धक्का दिला.

नूतन संचालक मंडळ

शिवाजी भगवान पाटील, जगन्नाथ आनंदा लोखंडे, कुंडलिक आनंदा आलदर, अनिल बाबा कदम, कृष्णा रामचंद्र गायकवाड, सागर बाळासो ढोले, बाळू भीमराव मोरे, तातोबा आप्पासाहेब पाटील, नाना नामदेव बंडगर, सुरेश पांडुरंग जरे, दादासो बायाजी वाघमोडे, पांडुरंग विठ्ठल पिसे, रमेश शिवाजी हातेकर, उज्ज्वल जालिंदर नवले, रतन वसंत मोरे, रामेश्वर ज्ञानू खिलारी, ब्रह्मदेव नाना होनमाने.