सोरडीत घरकुलाच्या पाया भरणीचे काम पूर्ण; अनुदान अडविले

गणेश कदम
Saturday, 8 August 2020

सोरडी ( ता. जत) येथे सन 2018-19 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आले आहे. पाया भरणी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे

जत : सोरडी ( ता. जत) येथे सन 2018-19 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आले आहे. पाया भरणी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान सरपंच व उपसरपंचांनी जातीय द्वेषातून घरकूलाचे अनुदान अडवून ठेवल्याचा आरोप करत या विरोधात दत्तात्रय काम्माण्णा पारसे व पत्नी रेश्‍मा पारसे व दोन्ही मुलांसह जत प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
दरम्यान, सरपंच व उपसरपंच यांनी जातीय द्वेषातून घरकूलाच्या अनुदान अडविल्याने त्यांच्या विरोधात ऍट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ही पारसे कुटुंबाने निवेदनाद्वारे केली आहे. याला दलित महासंघ, मातंग समाज संघटना व मातंग सेवा संघ बहुजन मोर्चा संघटनेने पाठिंबा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, दत्तात्रय पारसे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे घरकूलाच्या अनुदानाबद्दल दाद मागितली होती. यावर त्यांनी अनुदान देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. याबद्दल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी ही ग्रामपंचायतीला आदेश दिले आहेत. मात्र, सरपंच व उपसरपंच हे कोणालाही जुमानत नाहीत. यामुळे जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेऊ, असा पवित्रा पारसे कुटुंबाने घेतला आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The foundation work of the house in Soradi has Grants blocked