अर्ज माघारीचे चार दिवस ठरणार महत्त्वाचे 

अजित झळके  
Thursday, 31 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अर्ज माघारीचा राहणार आहे. आपल्या वार्डातील लढत एकास एक व्हावी की तिरंगी, चौरंगी व्हावी, कशात किती फायदा आणि तोटा आहे, याचे गणित मांडून आता नमस्कार, चमत्काराचा खेळ सुरु होईल.

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अर्ज माघारीचा राहणार आहे. आपल्या वार्डातील लढत एकास एक व्हावी की तिरंगी, चौरंगी व्हावी, कशात किती फायदा आणि तोटा आहे, याचे गणित मांडून आता नमस्कार, चमत्काराचा खेळ सुरु होईल. सरत्या वर्षाला रामराम करताना आणि उगवतीच्या सूर्याला नमस्कार करताना हौसे, नवसे, गवसे उमेदवार रिंगणात राहू नयेत, यासाठीही नमस्कार, चमत्काराचा खेळ सुरु होणार आहे. 4 जानेवारी ही माघारीची अंतिम तारीख आहे. 15 जानेवारीला मतदान आहे. 

जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींसाठी ग्राम-संग्राम पेटला आहे. इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. आज शेवटच्या दिवशी ऑफलाईन यंत्रणा अडचणीत आल्याने थेट अर्ज भरण्याची मुभा मिळाली आणि जिल्ह्यातील तहसिलदार कार्यालयाच्या बाहेर रांगाच्या रांगा लागल्या. लोकांनी इर्षेने अर्ज दाखल केले. कुणी इच्छेने तर कुणी "डमी' म्हणून अर्ज भरला आहे. रंगत जोरदार आहे. काट्याच्या लढती करण्यासाठी गाव कारभारी बाह्या मागे सारून पुढे सरसावले आहेत. या साऱ्यात आपले गणित जमण्यात, बिघडण्यात कुणाची उमेदवारी अडचणीची ठरू शकते, याची मांडणी महत्वाची. तीच अर्ज माघारीच्या पाच दिवसांत खरा खेळ मांडते. त्यामुळे पुढचे चार दिवस ग्रामपंचायत निवडणुकीत तितकेच महत्वाचे आहेत. 4 जानेवारी रोजी माघारीनंतर सरळ लढतीचे चित्र स्पष्ट होईल. 

उशीरापर्यंत बैठका सुरूच 
अर्ज माघारी घेण्यासाठी मनधरणीची प्रक्रिया 31 डिसेंबरला म्हणजे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुरु होईल. मावळत्या वर्षाला रामराम करताना माघारीसाठीही पायघड्या घालाव्या लागतील. रात्री उशीरापर्यंत बैठका चालतील. त्यातूनही जमले नाही तर नव्या वर्षाचे स्वागत दुसऱ्याच्या घरात रामप्रहरी हजेरी लावून करावे लागू शकते. कारण, एक बाजू एखाद्याला माघारीसाठी ताकद लावत असेल तर दुसरी बाजू त्याला उभेच राहण्यासाठी गळ घालणार आहे. हे चित्र गाव गाड्यातील कारभारी ठरवण्याच्या प्रक्रियेत अतिशय रंगतदार ठरणार आहे. 

भाजप-राष्ट्रवादीतच घमासान 
सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला राष्ट्रवादीचे जिल्ह्यात प्राबल्य आहे. गेल्या पाच वर्षात सत्ता नसल्याने राष्ट्रवादीतून बऱ्यापैकी आऊटगोईंग झाले होते. विशेषत: तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्‍यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते सत्तास्थानाच्या वळचणीला गेले होते. त्यामुळे गावागावातील समीकरणे बदलली आहेत. ग्राम संग्रामात त्या सगळ्यांचा हिशोब चुकता करण्याची नामी संधी आल्याने फ्रंटफुटवरील कार्यकर्ते बाह्या सरसावून कामाला लागल्याचे चित्र आहे. पै-पाहुणे, नाती-गोती, मित्र परिवाराचे गणित जमवून हा डाव गावागावात खेळण्याची तयारी सुरु आहे. भाजपनेही यंदा प्रथमच गावपातळीवर पक्षविस्ताराचा अंदाज घेण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. 

संभाव्य सरपंचाचे गुडघ्याला बाशिंग 
गेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांतील सरपंचपदाच्या आरक्षणाचा विचार करुन समीकरणांची मांडणी केली जात आहे. विशेषत: खुल्या प्रवर्गातील सरपंचपदासाठी इच्छुकांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर आले आहेत. प्रमुख नेत्यांनी आपापली प्यादी रिंगणात उतरवून ताकदीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. मागास किंवा इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पडण्याची शक्‍यता असलेल्या जागांवर कार्यकर्ते किंवा त्यांच्या सौभाग्यवतींनी अर्ज भरण्याचे आदेश आल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी चढाओढ सुरु होती.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four days of application withdrawal will be important