सांगलीत आजपासून चारचाकीत चार, दुचाकीवर दोन प्रवाशांना परवानगी

विष्णू मोहिते 
Sunday, 2 August 2020

राज्य शासनाने नव्याने शिथिल केलेल्या निर्बंधानुसार चारचाकी कारसारख्या गाड्यामध्ये चार, तर दुचाकीवर दोन प्रवाशांना प्रवास करण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे.

सांगली : राज्य शासनाने नव्याने शिथिल केलेल्या निर्बंधानुसार चारचाकी कारसारख्या गाड्यामध्ये चार, तर दुचाकीवर दोन प्रवाशांना प्रवास करण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. याचा परिणाम तातडीने जाणवू लागला आहे. 

करोनाचा पार्श्‍वभूमिवर केंद्र, राज्य सरकारने वाहनांमधील प्रवासी संख्येवर निर्बंध आणले होते. यापूर्वी कारसारख्या छोट्या चारचाकी वाहनांमध्ये चालक अधिक दोन अशा तिघांनाच तर दुचाकीवर फक्त चालकालाच परवानगी होती. चारचाकी किंवा दुचाकीवर क्षमतेपेक्षा जादा प्रवासी असल्यास कारवाई केली जात होती. राज्य सरकारने टाळेबंदीचे निर्बंध ऑगस्टपर्यंत वाढवताना 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि व्यापारी संकुले सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. 

गाड्यांमध्ये चालक अधिक तीन अशा चार प्रवाशांना परवानगी आहे. दुचाकीवर दोघांना प्रवास करता येईल. रिक्षात चालक अधिक दोन प्रवाशांची वाहतूक करता येईल. प्रवासात मुखपट्टी सक्तीची करण्यात आली आहे. मॉल्स आणि व्यापारी संकुले पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. मार्च महिन्यापासून मॉल्स बंद असल्याने साफसफाईकरिता आठवड्याची मुदत दिली आहे. 
 

"अत्यावश्‍यक सेवा,' हा उल्लेख वगळा 
प्रवासी क्षमता वाढवताना राज्य सरकारने "फक्त अत्यावश्‍यक सेवेसाठी,' असा उल्लेख अधिसूचनेत केला आहे. यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार प्राप्त होतात, अशी टीका सुरु झाली आहे. यामुळे पोलिसांना वाहने अडवून विचारणा करण्याचे अधिकार प्राप्त होतात. "अत्यावश्‍यक सेवा,' हा उल्लेख यामधून वगळावा, अशी मागणी आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four four-wheelers and two two-wheelers will be allowed