
कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या "कोव्हीड 19 सेंटरसाठी चारच दिवसांत सुमारे 400 पुस्तके जमली आहेत.
इस्लामपूर : कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या "कोव्हीड 19 सेंटरसाठी पुस्तके द्या' या तहसीलदार रवींद्र सबनीस आणि वाचन चळवळ यांच्या आवाहनाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चारच दिवसांत सुमारे 400 पुस्तके जमली आहेत. वाचन चळवळीने ही पुस्तके तहसीलदारांच्या ताब्यात दिल्यावर या उपक्रमाचे तहसीलदार सबनीस यांनी कौतुक केले. आणि हा उपक्रम रुग्णांना आधार देईलच; परंतु इतरांनाही प्रेरणा देईल, असे ते म्हणाले.
कोरोना विषाणू संसर्गाची सुरवात झाल्यावर महाराष्ट्रात सर्वप्रथम शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले. 27 जणांना एकाच वेळी लागण झाली होती. त्यामुळे सुरवातीलाच स्थानिक प्रशासनाने त्याला तोंड देत त्यावर मात केली. त्यानंतरच्या काळात मात्र प्रशासनाने सर्वच पातळ्यांवर शहर आणि वाळवा तालुक्यात योग्य उपाययोजना केल्या आहेत. आगामी काळातील कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्लामपुरात कोव्हीड सेंटर उभारण्यात येत आहे. याठिकाणी दाखल केलेल्या रुग्णांना मानसिक स्थैर्य आणि आधार मिळवून देण्यासाठी पुस्तके मोलाची भूमिका पार पाडतील, या हेतूने तहसीलदारांनी या कोव्हीड सेंटरसाठी आपल्याकडे वाचलेली, नको असलेली पुस्तके, तसेच मासिके, जुने दिवाळी अंक द्यावेत, असे आवाहन केले होते. सीमेवरील मराठी जवानांसाठी सुरू असलेल्या वाचन चळवळीने त्यासाठी पुढाकार घेतला. या चळवळीच्या माध्यमातून चारच दिवसांत सुमारे 400 पुस्तके जमा झाली. ती प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
या वेळी तहसीलदार सबनीस म्हणाले, की रुग्णांना 14 दिवस उपचारांसाठी दाखल केल्यावर मनोरंजन व्हावे, यासाठी आणि ते चांगल्या दर्जाचे असावे म्हणून पुस्तकांचा पर्याय योग्य वाटला. कोरोनाची बाधा झाल्याने एकप्रकारची नकारात्मकता आणि नैराश्याची भावना निर्माण होते. या काळात पुस्तके त्यांना दिलासा देण्याचे काम करतील. पुस्तकांबरोबरच आणखी काही चांगल्या सुविधा, मेडिटेशन कोर्स यांसारखे उपक्रम या सेंटरमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. या वेळी प्रा. डॉ. संजय थोरात, डॉ. दीपक स्वामी, दत्ता माने, उमेश कुरळपकर, प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. राहुल गौर, मिलिंद थोरात, प्रा. एस. टी. सानप, रवी बावडेकर उपस्थित होते.
पुस्तक दाते असे...
माणिक वांगीकर, शहानवाज मुल्ला, सुशांत दिनकर पाटील, विजय तिबिले, अनिल पाटील, प्रवीण पाटील, संजय ओसवाल, कपिल ओसवाल, मदन मोहिते, राजू ओसवाल, महेंद्र पाटील यांच्यासह वाचन चळवळीच्या सदस्यांनी पुस्तके जमा केली.