दोन अपघातांत चार ठार, एक जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

सिंदखेडा येथील ऊसतोडणी कामगार सांगली जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. हंगाम संपल्याने ते सांगली येथून टेम्पोतून (एमपी 09 जीएन 3888) साहित्यासह गावी निघाले होते.

श्रीगोंदे : नगर-दौंड महामार्गावरील काष्टी व चिखली शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैशाली अजय सोनवणे (वय 20), मंदाबाई बोरसे (वय 30, रा. पडावेत, ता. सिंदखेडा, जि. धुळे), सचिन दत्तात्रय बारगुजे (वय 35), अशोक नानासाहेब पवार (वय 49, रा. घोटवी, ता. श्रीगोंदे), अशी मृतांची नावे आहेत. 

सिंदखेडा येथील ऊसतोडणी कामगार सांगली जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. हंगाम संपल्याने ते सांगली येथून टेम्पोतून (एमपी 09 जीएन 3888) साहित्यासह गावी निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास टेम्पो काष्टी शिवारातील राहिंजवाडी येथे आला असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला (एमएच 16 एवाय 9775) त्याने पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत टेम्पोत बसलेल्या वीस प्रवाशांपैकी वैशाली सोनवणे व मंदाबाई बोरसे ठार झाल्या. अजय सोनवणे गंभीर जखमी झाले. टेम्पोतील अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 

दुसरा अपघात नगर-दौंड महामार्गावरील चिखली घाटानजीक काल (गुरुवारी) रात्री नऊच्या सुमारास घडला. त्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सचिन बारगुजे व अशोक पवार हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. बेलवंडी पोलिसांनी सांगितले, की वरील दोघे नगर येथे कांदाविक्री करून घोटवी गावाकडे निघाले होते. चिखली घाटात त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात दोघे जागीच ठार झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four killed, one injured in two accidents