केरळहून मोटारसायकलवरून चौघे राजस्थानला निघाले इथे झाले क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

केरळमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या राजस्थानमधील चौघा तरुणांची मिरजेमध्ये "इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन'मध्ये रवानगी करण्यात आली.

मिरज : केरळमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या राजस्थानमधील चौघा तरुणांची मिरजेमध्ये "इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन'मध्ये रवानगी करण्यात आली.

मूळ राजस्थानमधील हे चौघे केरळमध्ये बांधकामावर टाईल्स बसवण्याचे काम करतात. संचारबंदी जाहीर झाल्यानंतर हे चौघे 13 एप्रिलला (सोमवारी) मोटारसायकलवरून केरळमधून राजस्थानकडे निघाले. पोलिसांची तपासणी केंद्रे चुकवत त्यांनी आज (शुक्रवारी) मिरज (जि. सांगली) गाठले. मिरजमध्ये बसस्थानक परिसरातून हे चौघे वेगाने पंढरपूरकडे जात असताना त्यांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी हटकले.

या तरुणांचा अवतार आणि त्यांच्याकडील साहित्य पाहिल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली; पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी त्यांचा नेहमीचा खाक्‍या दाखवताच चौघेही खरं बोलू लागले आणि त्यांनी आपण मूळचे राजस्थानचे असून केरळमध्ये बांधकाम ठेकेदाराकडे फरशी फिटिंगचे काम करतो, असे सांगून केरळमध्ये संचारबंदी काळात राहणे अवघड वाटू लागल्याने मोटारसायकलवरून राजस्थानला निघाल्याचे सांगितले.

केरळ ते मिरज या दरम्यानच्या प्रवासात त्यांना काही ठिकाणी अडवण्यात आले; परंतु काही काळ थांबवून घेऊन पुन्हा पुढे जाऊ देण्यात आले. बहुसंख्य ठिकाणी पोलिसांची नजर चुकवून या तरुणांनी मिरज गाठले खरे; परंतु मिरज शहरातील पोलिसांच्या नजरेतून ते सुटले नाहीत. पोलिसांनी तातडीने या चौघांचीही तपासणी करून त्यांना संस्था विलगीकरण केंद्रात पाठवले. तेथेही या चौघांनी थोडीफार नाटके करण्याचा प्रयत्न केला; परंतु पुन्हा एकदा पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर हे चौघेही मुकाट्याने शांतपणे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाले. 

शेकडो भाकऱ्या, चटण्या, लोणची 
या चारही तरुणांनी केरळ ते राजस्थान या दरम्यानच्या प्रवासात खाण्यासाठी कोठेही काही मिळणार नाही हे ओळखून बाजरीच्या शेकडो भाकऱ्या, चटण्या, लोणची सोबत घेतले होते. चौघांना क्वारंटाईन केल्यानंतर हे सर्व खाद्यपदार्थ पोलिसांनी जप्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four people started from Kerala for Rajastan, but Quarantined here