मुरुम पसरताना भांडणातून दोघांना मारहाण, वाळव्यात प्रकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्यावर मुरुम पसरण्याच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत शिरगाव (ता. वाळवा) येथील दोघे जखमी झाले.या प्रकरणी प्रसाद हणमंत हवलदार (रा. शिरगाव, ता. वाळवा) यांनी चौघांविारोधात आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाळवा (सांगली) ः शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्यावर मुरुम पसरण्याच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत शिरगाव (ता. वाळवा) येथील दोघे जखमी झाले.या प्रकरणी प्रसाद हणमंत हवलदार (रा. शिरगाव, ता. वाळवा) यांनी चौघांविारोधात आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शिरगाव येथील नंदकुमार संपत हवलदार, प्रशांत संपत हवलदार, कोतवाल सर्जेराव श्रीपती हवलदार, अतुल रंगराव हवलदार (सर्व रा. शिरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हवलदार यांची शिरगाव येथील हवलदारनगर परिसरात शेती आहे. त्यांचे शेजारी नंदकुमार हवलदार व इतरांची शेतजमीन आहे. शिवाय गावातील ते शेजारी-शेजारी आहेत. जमीनीवरुन प्रसाद हवलदार व सर्जेराव हवलदार यांच्या तक्रारी सुरु आहेत. त्यातच सर्जेराव हवलदार यांच्यासह इतरांनी शेतात येण्याजाण्याच्या रस्त्यावर मुरुम पसरण्याचे काम काल सुरु केले होते. त्या बाबत प्रसाद हवलदार यांनी जाब विचारला असता सर्जेराव हवलदार व इतर चौघांनी लाकडी दांडके, कुदळ व इतर हत्यारांनी मारहाण केली. 

या मारहाणीत पुजा हणमंत हवलदार यासुध्दा जखमी झाल्या. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी चौघांविरोधात 324, 452, 323, 504, 506, 34 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान शिरगाव येथील माजी उपसरपंच माणिक पवार यांनी कोतवाल सर्जेराव हवलदार यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात कोतवाल सर्जेराव हवलदार गावात मनमानी कारभार करीत आहेत, चावडी कार्यालयात लोकांना नाहक त्रास देत आहेत, वारंवार समज देऊनही सर्जेराव हवलदार यांच्या कामकाजात बदल होत नाही, त्यांची खातेनिहाय चौकशी करावी व गावाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर श्री. पवार यांच्यासह गावातील नागरिकांच्या सह्या आहेत. अशा स्वरुपाचे निवेदन नागरिकांनी वाळव्याच्या प्रांताधिकाऱ्यांनाही दिले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four peoples hit two peoples in walwa