घरात घुसून लुटीचा बिसूरमध्ये प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

काही दिवसांपूर्वी याच परिसरातील चार म्हैशी चोरीस गेल्या होत्या. त्या कऱ्हाड तालुक्‍यातील एका ठिकाणी मिळाल्या. परिसरात पाळत ठेऊन चोरी करणाऱ्याचा वावर वाढला आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. 

सांगली ः बिसूर - कवलापूर रस्त्यावरील एका घरात घुसून चार चोरट्यांनी वृद्धेस चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांच्या हाती काय लागले नाही. ती महिला घरी एकटीच होती. परिसरात घबराट पसरली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरातील चार म्हैशी चोरीस गेल्या होत्या. त्या कऱ्हाड तालुक्‍यातील एका ठिकाणी मिळाल्या. परिसरात पाळत ठेऊन चोरी करणाऱ्याचा वावर वाढला आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की बिसूर - कवलापूर रस्त्यावर एका घरात 70 वर्षीय वृद्धा राहते. त्यांचा एक मुलगा सैन्य दलात आहे. वृद्धा एकटीच घरी आहे. काल रात्री त्या नेहमीप्रमाणे पुढील दरवाज्याला कुलूप लावून मागील दरवाजातून घरी जाऊन झोपल्या. मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

वृद्धेस जाग आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत पैसे आणि सोने-चांदीची मागणी केली. त्यांच्याकडे काही नसल्याचे समोर आल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. मात्र वृद्धेचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा तत्काळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे पसार झाले होते. 

याच परिसरात काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. एका गोठ्यातील चार म्हैशी चोरट्यांनी चोरल्या होत्या. त्यानंतर लगेचच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. ग्रामीण पोलिसांनी गस्तीत वाढ करावी, अशी मागणी होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thieves broke into the house and robbed