शिक्षण विभागातील घोटाळेबाजांवर कारवाईचा कोल्हापूर जिल्हा परिषदेत ठराव 

शिक्षण विभागातील घोटाळेबाजांवर कारवाईचा कोल्हापूर जिल्हा परिषदेत ठराव 

कोल्हापूर - गेली काही महिने सतत शिक्षण विभागाच्या कारभाराची लक्‍तरे चव्हाट्यावर मांडली जात आहेत. मॅट खरेदीतील घोटाळा, सतरंजी वाटपात अनियमितता झाली आहे. शिक्षक बदल्या तर जिल्ह्यासह परजिल्ह्याबाहेरही चर्चेचा विषय ठरला आहे. एकूणच शिक्षण विभागाचे काम अत्यंत लाजीरवाणे सुरू आहे, अशा शब्दात सदस्यांनी शिक्षण विभागाच्या कारभाराचा समाचार घेतला. यावर मॅट खरेदी व सतरंजी पुरवठ्यात झालेल्या अनियमिततेला दोषी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा ठराव झाला. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज राजर्षी शाहू सभागृहात झाली. अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवि शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, सर्व विभागप्रमुख व सदस्य उपस्थित होते. 
शिक्षण विभागाचे कामकाज वादग्रस्त सुरू आहे.

शिंगणापूरसारखी देशातील उत्कृष्ट क्रीडाशाळा नावारूपाला येत आहे. मात्र, येथील मॅट खरेदीत घोटाळा झाला. निकृष्ट मॅट खेळाडूंच्या माथी मारल्याचा आरोप शिवाजी मोरे यांनी केला. सतरंजी देण्यातही अनियमितता झाली आहे. मॅट खरेदीत स्पेसिफिकेशनचा मुद्दा पुढे करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. शिक्षण विभागाच्या या कामाची लाज वाटत असल्याचे मोरे यांनी सांगितले. 

सदस्य हंबीरराव पाटील, उमेश आपटे, आकांक्षा पाटील, अरुण इंगवले यांनी शिक्षक बदल्यांबाबत प्रश्‍नांची सरबत्ती केली. एक टर्म संपत आली तरी शाळांना शिक्षक नाहीत. दरवेळी शिक्षक मागणीचा विषय आला, की तोंडाला पाने पुसली जातात, अशी टीका त्यांनी केली. तसेच मनमानी पद्धतीने बदल्या केल्या जात असल्याबद्दल सदस्यांनी जाब विचारला. 

मित्तल यांनी मागितली माफी 
शाहूवाडी तालुक्‍यातील शिक्षकांच्या रिक्‍त जागा भराव्यात, यासाठी सदस्य हंबीरराव पाटील व काही पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी मित्तल यांनी पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव पाठवीन, असा दम दिला होता. याचे पडसाद सभेत उमटले. सीईओंच्या मनात येईल तशी कारवाई होणार का?, तुम्हाला काय अधिकार आहेत?, अशी विचारणा श्री. पाटील यांनी केली. वाद चिघळू लागल्यानंतर प्रकाराबद्दल मित्तल यांनी पाटील यांची माफी मागत या विषयावर पडदा टाकला. 

दोषींवर कारवाई करणार 
मॅट खरेदीचा निर्णय पूर्वीच्या सभागृहात झाला होता. स्पेसिफिकेशन चुकीचे होते. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. मात्र, यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच सतरंजी घोटाळ्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर धक्‍का बसला. हातकणंगलेतील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना या सतरंज्या पुरवल्या नाहीत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांनी सांगितले. 

इंगवले, पाटील यांच्यात खडाजंगी 
हंबीरराव पाटील हे शिक्षक प्रश्‍न व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली अपमानास्पद वागणूक यावर बोलत होते. यावेळी पाटील यांना समर्थन देण्यासाठी काही सदस्य उभे होते. याचा राग अरुण इंगवले यांना आला. सभागृहात किती लोक बोलत आहेत, अशी विचारणा करत हा काही कोंबडी बाजार आहे का?, अशी विचारणा त्यांनी केली. यावर संतापलेल्या पाटील यांनी इंगवले यांनाच खाली बसण्याची सूचना केली. तुम्ही मध्येच कशाला बोलता, असे सांगत खाली बसण्याची सूचना केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com