esakal | मोकळ्या वेळेत मुले करताहेत हे काम; व्यवहार ज्ञानाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

In free time, children are selling vegetables! ; Lessons of transactional knowledge

शाळा बंद असल्यामुळे मोकळीक मिळालेली ग्रामीण भागातील मुले भाजीपाला विक्रीतून व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष धडे गिरवत आहेत.

मोकळ्या वेळेत मुले करताहेत हे काम; व्यवहार ज्ञानाचे धडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इटकरे (जि. सांगली) : शाळा बंद असल्यामुळे मोकळीक मिळालेली ग्रामीण भागातील मुले भाजीपाला विक्रीतून व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष धडे गिरवत आहेत. मात्र भाजी विक्रीच्या या व्यवहारात ही मुले दाखवत असलेला प्रामाणिकपणा अनेकांसाठी मार्गदर्शक आहे. 

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाले असले, तरी अद्याप शैक्षणिक वर्षाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. एरवी जुनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळेच्या लगबगीत असलेली मुले अजूनही तशी निवांतच आहेत. काही शाळांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय सुरू केला आहे. मात्र सर्वच विद्यार्थ्यांकडे अँड्राईड मोबाईल उपलब्ध होऊ शकत नाही. त्यावर काही विद्यार्थ्यांनी मित्रांच्या घरी जात अभ्यास मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

ऑनलाईन अभ्यासाचा पर्याय असला तरी विद्यार्थ्यांकडे बराच वेळ मोकळा आहे. ग्रामीण भागातील मुलांनी या मोकळ्या वेळेचा चांगला उपयोग केला आहे. आपआपल्या शेतात पीकणारा भाजीपाला घरोघरी जाऊन विकत त्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे. शैक्षणिक वर्षात अनेक शाळा हा उपक्रम शाळेत राबवतात. मात्र त्यावेळी या मुलांना पालक आणि शिक्षकांची मदत असते. सध्या मात्र ही मुले सर्व शेतातून भाजीपाला आणून तो विक्री करुन त्याचा हिशोब पालकांकडे देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन बाहेर पडत आहेत. 

काही मुले शेताच्या बाहेर रस्त्यालगत भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसतात, तर काही फिरुन विक्री करत आहेत. यासाठी त्यांनी सायकलीचा वापर केला आहे. सायकलच्या कॅरियर कॅरेट बांधून त्यात भाजीपाला, तेथेच एक काठी उभी करुन त्याला तराजुची व्यवस्था, असं छोट्यांचं फिरतं दुकान सध्या ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. ग्राहकही कौतुकाने त्यांच्याकडून भाजी खरेदी करताना दिसतात.

अनेकदा 5-10 रुपये सुटे नसल्यास ग्राहक "राहू दे तुला' असे म्हणतात, मात्र ही मुले त्या बदल्यात "आणखी थोडी भाजी घ्या' असे म्हणत प्रामाणिकपणा दाखवतात. शिवाय प्रमाणापेक्षा कमी किमतीत भाजी मागणाऱ्या ग्राहकांना मुले ठासून नकार देत आहेत. या साऱ्या प्रक्रियेत मुले काळजीपुर्वक मास्कचा वापर देखील करीत आहेत.  

loading image