ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचे निधन....जेलफोडो आंदोलनातील शिलेदार...बॉम्ब बनवण्याचेही घेतले होते प्रशिक्षण 

प्रमोद जेरे 
Sunday, 23 August 2020

मिरज, (सांगली)-  जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सांगली जेल फोडो आंदोलनातील सहभागी शेवटचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे (वय 102) यांचे आज (रविवारी) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

मिरज, (सांगली)-  जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सांगली जेल फोडो आंदोलनातील सहभागी शेवटचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे (वय 102) यांचे आज (रविवारी) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

ते मूळचे कोकणातील राजापूर तालुक्‍यातील जुना कोळवण गावचे. कुष्टे हे स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी सांगलीत आले. सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. लाड, वसंतदादा पाटील, हुतात्मा किसन अहिर, नामदेवराव कराडकर यांचेसह अनेक स्वातंत्र्य सैनिकांशी त्यांचा संपर्क आला. स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी त्या काळी मोठ्या रकमेचे बक्षीस जाहीर केले होते. तब्बल बारा वर्षे ते भूमिगत राहिले. या कालावधीत त्यांना अकलूजच्या शंकरराव मोहिते-पाटील यांनी आश्रय दिला. सलग बारा वर्षे ते अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाड्यामध्ये वास्तव्यास राहिले. तरीही त्यांचा ब्रिटिश सरकारला थांगपत्ता लागला नाही.

सांगली, सातारा, कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्यांमधील ब्रिटिश विरोधी आंदोलनात ते अग्रभागी राहिले. सांगलीत 24 जुलै 1943 रोजी झालेल्या जेल फोडो घटनेतील ते स्वातंत्र्य सैनिक होते. यावेळी एकूण बारा स्वातंत्र्यसैनिक या जेल फोडो आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये आण्णासाहेब पत्रावळे आणि बबनराव जाधव हे दोघे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाले. तर वसंतदादा पाटील हे खांद्यावर गोळी लागुन जखमी झाले. दहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले. यामध्ये जयराम कुष्टे यांचा समावेश होता. ब्रिटिशांविरोधात आंदोलनात त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सांगलीतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्राणज्योत आज (रविवारी) सकाळी मालवली. 

त्यांच्या पार्थिवावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, नातवंडे, परतवंडे, असा परिवार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: freedom fighter Jairam Kushte passed away . Shiledar of Jailfodo movement . He was also trained to make bombs