वडिलांच्या विरोधात दोस्त आखाड्यात... लाड विरुद्ध देशमुख !  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

देशमुख आणि लाड हे दीर्घकाळ एकत्र राष्ट्रवादीत होते. अरुण लाड यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड आणि संग्रामसिंह देशमुख हे जिगरी दोस्त. जिल्हा परिषदेत संग्रामसिंह अध्यक्ष तर शरद लाड विरोधी गटनेते. तेथेही त्यांनी दोस्ती जपली.

वडिलांच्या विरोधात दोस्त आखाड्यात... लाड विरुद्ध देशमुख ! 

सांगली ः पुणे पदवीधर मतदार संघातील कुस्ती अखेर ठरली आहे. भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीने उशीरा पण अपेक्षेप्रमाणे अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पलूस-कडेगाव या एकाच विधानसभा मतदार संघातील दोन मातब्बरांमध्ये ही लढत होईल. देशमुख आणि लाड हे दीर्घकाळ एकत्र राष्ट्रवादीत होते. अरुण लाड यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड आणि संग्रामसिंह देशमुख हे जिगरी दोस्त. जिल्हा परिषदेत संग्रामसिंह अध्यक्ष तर शरद लाड विरोधी गटनेते. तेथेही त्यांनी दोस्ती जपली. एकमेकांवर कधीच हेवेदावे केले नाहीत. आता मात्र पदवीधरच्या रणांगणात शरद लाड यांच्यासाठी "वडिलांच्या विरोधात दोस्त आखाड्यात', अशी स्थिती आहे. अर्थात, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून लाड गटाने आपला मार्ग बदलून देशमुखांऐवजी पतंगराव कदम गटाशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे ही लढत मित्रांची असली तरी काट्याची होणार हे नक्की आहे. 

दिवंगत पतंगराव कदम यांच्या राजकारणाला बळकटी देणाऱ्या प्रमुख लोकांमध्ये क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांचा वाटा आहे. लाड हे मूळ डाव्या विचारांचे कट्टर समर्थक होते. कालांतराने ते राष्ट्रवादीत आले. जी.डी. बापू हे अरुण लाड यांचे वडील. कालांतराने काही कारणांनी लाड गटाने पतंगराव कदम यांच्या विरोधात भूमिका घेतली. पतंगरावांचे विरोधक तथा संग्रामसिंह यांचे वडिल दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख, चूलतबंधू माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या पाठीशी लाड यांची ताकद राहिली. कदम यांना लाड गटाने विरोध केला. अर्थात दोनवेळा देशमुखांनी बाजी मारली, मात्र त्यानंतर देशमुख-लाड यांची एकी असतानाही पतंगराव कदम विजयी होत आले. देशमुखांनी 2014 भाजपमध्ये प्रवेश केला, पृथ्वीराज देशमुख विधानसभा लढले, त्यावेळीही लाड यांनी राष्ट्रवादीत राहून भाजपमधील देशमुखांना सहकार्य केले होते. गेल्या काही वर्षांत मात्र देशमुख आणि लाड यांच्यात दरी पडली. लाड नैसर्गिकरित्या कदम गटाकडे सरकले. त्यांनी कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्याशी जुळवून घेतले. आता कदम-लाड अशी एकी आहे. देशमुख गटातील पुढची पिढी म्हणून संग्रामसिंह यांचे नेतृत्व पुढे आले आणि ते आता अरुण लाड यांच्या विरोधात पदवीधर मतदार संघातून लढणार आहेत. गंमत म्हणजे, संग्रामसिंह देशमुख हे अरुण लाड यांचे चिरंजीव शरद यांचे समवयस्क आणि जवळचे मित्र आहेत. राजकारणात एकत्र काम करताना त्यांचे घनिष्ठ संबंध आले. 


जिल्हा परिषदेच्या राजकारणात संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष झाले. राष्ट्रवादी विरोध पक्ष. त्याचे नेतृत्व शरद लाड यांच्याकडे आले, मात्र शरद यांनी कधीही देशमुख यांच्या कारभाराचे वाभाडे काढले नाहीत. त्यांनी मित्राला चांगल्या कारभाराच्या शुभेच्छा दिल्याच आणि वादग्रस्त विषयांत फार ताण काढला नाही. त्याबाबत "सकाळ'ने "शरदभाऊ बस्स झाले आता लाड', अशा मथळ्याखाली या मैत्रीला चिमटेही काढले होते. संग्रामसिंह देशमुख यांना सहा महिन्यांपूर्वी निरोप आला की पदवीधरसाठी तयारी करा. त्यावेळी जिल्हा परिषदेतील सहकारी सदस्यांनी शरद लाड यांची थट्टा सुरु केली. ""आता काय करता? तुमचा मित्रच तुमच्या वडिलांच्या विरोधात लढणार, मग कसे होणार'', असा तो मुद्दा होता. तो सहज व हलक्‍या फुलक्‍या चर्चेचा भाग असला तरी आता ती वस्तूस्थिती आहे. देशमुख विरुद्ध लाड लढाई ठरली आहे. अशावेळी वडिलांचे आमदार होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शरद लाड यांना मित्राच्या पराभवासाठी ताकद लावावी लागणार आहे. 

loading image
go to top