
शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सकाळी स्टेशन चौकातून फेरी काढण्याची तयारी सुरू
सांगली : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला आज चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. सांगली आणि मिरज या दोन प्रमुख शहरांमधील पेठांमध्ये बहुतांशी दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान सकाळच्या टप्प्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सकाळी स्टेशन चौकातून फेरी काढण्याची तयारी सुरू झाली आहे. ही फेरी सांगलीतील सर्व पेठांतून फिरून व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करेल.
केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब हरियाणा सह उत्तर भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्या आंदोलनाची दडपशाही सुरू असल्याचा निषेध करत देशभरातील शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. काही शेतकरी संघटनांचा अपवाद वगळता अनेकांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांश ठिकाणी बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा- पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयसिंगपूरात होणार आता रेशीम कोश खरेदी -
सांगली, मिरज शहरातील व्यापारी संघटनांनी बंद च्या पाठीशी राहणार की त्याला विरोध करणार अशी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसली तरी परिस्थिती पाहता दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने आज सकाळी सुरू झाली नाहीत. व्यापारी पैठणमध्ये तूर्त शुकशुकाट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी स्टेशन चौकातून फेरी काढून या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्याचे ठरवले आहे. त्याचे नियोजन सुरू आहे.
संपादन- अर्चना बनगे