अंत्यसंस्कारासाठी 'त्या' मृतदेहांची झाली ससेहोलपट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोविड आजाराने रुग्ण मृत असेल तर त्याचे अंत्यसंस्कार येथे होतात. अन्य कोणत्याही आजाराने व्यक्ती गेली असेल तर त्या व्यक्तीवर त्याच्या गावीच अंत्यसंस्कार झाले पाहिजे

कऱ्हाड :  कोरोनाची नागरीकांनी अधिकच धास्ती घेतली आहे. कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तरी तो कोरोनाबाधितच असावा असे समजून गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून दिले जात नाहीत. असाच अनुभव शिरळ व कोयनानगर येथील नागरीकांना आला. विविध आजाराने मृत्यू झालेल्या शिरळ व कोयनानगर येथील मृतदेह कऱ्हाडच्या स्मशानभूमीत आणण्यात आले पण अधिकाऱ्यांची परवानगी नसल्याने तेथे अंत्यसंस्कार करून दिले नाहीत. त्यामुळे मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्यात आले. तेथेही गावातील लोकांनी अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा कऱ्हाडला आणण्यात आले तेथे दहनाची परवानगी नसल्याने पुन्हा गावी नेण्यात आले. केवळ परवानगी व कोरोनाच्या भितीपोटी दोन मृतदेहांची अक्षरशा ससेहोलपट पहायला मिळाली.

 

शिरळ व कोयनानगर येथील दोघे रुग्ण अन्य दुसऱ्या आजाराने येथील एका हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्या दोन्ही मृतदेहांना त्या रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांच्या गावी पाठवले. पहिला मृतदेह शिरळ व नंतर कोयनानगरचा पाठवला. मात्र, त्या दोन्ही गावात त्या रुग्णवाहिका बघताच दोन्ही मृतदेह घेण्यास नकार देत आम्ही अंत्यसंस्काराला परवानगी देत नसल्याचे सांगत त्या दोन्ही रुग्णवाहिका थेट कऱ्हाला धाडल्या. त्या दोन्ही रुग्णवाहिका थेट कऱ्हाड येथील स्मशानभूमीत आणल्या. 

त्या वेळी तेथे आरोग्य विभागाचे कर्मचारी रामा भिसे यांच्यासह त्यांचे काही लोक उपस्थित होते. कोविड आजाराने रुग्ण मृत असेल तर त्याचे अंत्यसंस्कार येथे होतात. अन्य कोणत्याही आजाराने व्यक्ती गेली असेल तर त्या व्यक्तीवर त्याच्या गावीच अंत्यसंस्कार झाले पाहिजे, असे श्री. भिसे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या लोकांनी वाद घातला. श्री. भिसे यांनी थेट मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना फोन करून त्याची माहिती दिली.

त्यावर कोविडचे संशयित रुग्ण नसतील तर आपण येथे अंत्यसंस्काराची परवागी देत नाही. त्यांना आपल्या स्थानिक गावी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतील, असा नियम आहे, असे श्री. डांगे यांनी सांगितले. अखेर ते दोन्ही मृतदेह आपल्या मूळ गावी शिरळ व कोयना येथे पाठविण्यात आले.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: funeral Problem In Karad And Patan Taluka