अंत्यसंस्कार करताना स्मशानही गहिवरले...

Funeral services
Funeral services

नातेपुते (सोलापूर) : अकलूज येथील स्मशानभूमीत निराधार आजीवर बेवारस पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. तशी सुरवातही झाली होती. परंतु, अचानक तेथे दलित महासंघाचे राजाभाऊ खिलारे यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पार पाडले. अशा शेवटच्या क्षणी तरी आजीला कोणीतरी पाणी पाजायला मिळाले, हे दृश्‍य पाहून कदाचित स्मशानभूमीही गहिवरली असेल. 

राजाभाऊ खिलारे म्हणाले, सोमवारी दुपारी तीन वाजता दिलीप लोंढे यांच्या पार्थिवास अग्नी देण्यासाठी अकलूजच्या स्मशानभूमीमध्ये गेलो होतो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो. तेवढ्यात समोरून एक छोटा हत्ती टेम्पो स्मशानात आत येताना दिसला. सहज लक्ष गेले तर त्या गाडीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह होता, त्यावर पांढरे कापड टाकले होते. त्या महिलेस अंत्यसंस्कारासाठी एकच व्यक्ती घेऊन आली होती. हे दृश्‍य पाहून माझे मन हेलावले. नेमका काय प्रकार असावा हा विचार मला तेथून हलू देईना आणि पोटात भुकेचे कावळेही ओरडत होते. शेवटी मृतदेहाजवळ गेलो तर तेथे एकच माणूस धडपड करत होता. गाडीचा चालक खालीसुद्धा उतरला नाही. तो एकटाच झटत होता. मृतदेह टेकून बसवला होता. डोळे अर्धवट उघडे वय साधारण 75 ते 80 असावे. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडे, शिवाय हार, फुले, हळद, कुंकू, नवीन कापड, बुका, गुलाल काहीही नव्हते. होत्या फक्त चिंध्या आणि प्रेताच्या अंगावरचे लुगडे व समोर त्या व्यक्तीची चाललेली धडपड हे सर्व पाहून माझे मन हेलावले. मला गलबलून आले. मी त्या माणसाला विचारले यांचे कोणीच कसे आले नाही, तुम्ही एकटेच कसे? तो माझ्याकडे आला, तो मला म्हणाला, ही आजी 25 ते 30 वर्षांपूर्वी भटकत आमच्या मालकाच्या वस्तीला राहिली होती. तिला मूलबाळ, नातेवाईक असे जवळचे कोणीच नव्हते. ती निराधार होती. ती आमच्या मालकाच्या रानात बऱ्याच वर्षांपासून राहत होती. किरकोळ कामे करत होती. आजारपणामुळे खूप दिवस झोपून होती. सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो होतो; पण उपयोग झाला नाही. 

आज तिच्या आयुष्याचा शेवट झाला. आमचे मालक बाहेरगावी आहेत. त्यांनी मला पैसे पाठवून दिले आणि सांगितले "तू अंत्यसंस्कार कर, मी त्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतो. त्यामुळे मी तिला एकटाच घेऊन आलो आहे. हे ऐकून माझे मन हळहळले. ही घटना ऐकून मला घरी जाऊच वाटेना. मी मनाचा निर्णय घेतला आणि लागलो चिता रचायला. चिता रचली. ते पाहून माझे मित्र राहुल धाईंजे व गायकवाड कंपनी माझ्या मदतीला धावून आली. आम्ही सर्वांनी चिता रचून त्या वृद्धेला चितेवर ठेवले. माझे मित्र कळत न कळत त्या चितेसाठी काट्याकुट्या, पाचट, चिंध्या गोळा करून मला मदत करण्याचा प्रयत्न करू लागले. मी एकटक त्या रचलेल्या चितेकडे बघत होतो; काहीएक संबंध नसताना आम्ही त्या वृद्धेवर अंत्यसंस्कार करत होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com