esakal | बाराही राशींचं भविष्य ठरलं तंतोतंत खरं, वाचा तुम्हीच... खोटं निघालं तर चॅलेंज
sakal

बोलून बातमी शोधा

Rashichkra

ज्योतिषशास्त्रावर भरोसा नसलेले लोकही या कॉलमध्ये डोकावतातच. यावरून लोकांचा ज्योतिषशास्त्रावरील श्रद्धा दिसून येते. तेही काहीही असले तरी आज बाराही राशींचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. ते कोणत्याही राशीची व्यक्ती नाकारू शकली नाही. खोटं वाटत असलं तर वाचा...

बाराही राशींचं भविष्य ठरलं तंतोतंत खरं, वाचा तुम्हीच... खोटं निघालं तर चॅलेंज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर - दररोज कोणाच्या ना कोणाच्या राशीला काही तरी अडचणी असतात. त्यावर उपायही सांगितलेले असतात. कोण सांगतो... बाहेर पडाल तर अडचणीत याल. आज लॉटरीचे तिकीट खरेदी करून बघा. आर्थिक व्यवहार करू नका. प्रेयसीसोबत आज भांडण होण्याची शक्यता. आज ना तुम्ही प्रवास करूच नका, असे  सल्ले दिलेले असतात. बहुतांशी लोक ते पाळतातही. 

वर्तमानपत्रात दररोज राशीभविष्यात दिलं जातं. किंवा टीव्हीवरील अध्यात्मातील गुरूही ज्योतिष सांगत असतात. यातील किती खरे ठरते किंवा किती खोटे ठरते, हा आपापला वैयक्तिक अनुभव आहे. लोकांना राशीभविष्य जरी खोटे वाटत असले किंवा ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर भरोसा नसलेले लोकही या कॉलममध्ये डोकावतातच. यावरून लोकांचा ज्योतिषशास्त्रावरील श्रद्धा दिसून येते. 

ते काहीही असले तरी आज बाराही राशींचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. ते कोणत्याही राशीची व्यक्ती नाकारू शकली नाही.

आजचे राशिभविष्य - 
मेष - दिवसभर घरी रहाल.
वृषभ - दिवसभर घरी रहाण्याचा योग
मिथुन - घराबाहेर पडण्यात अडचणी येतील
कर्क - कुटुंबियांसोबत घरीच वेळ घालवाल. 
सिंह -  घरातच अडकून पडाल.
कन्या - घराबाहेर पडण्यात अडचणी येतील
तुळ - प्रवासाचे बेत उधळले जातील, घरी रहाण्याचा योग
वृश्चिक - घराबाहेर पडू नये. 
धनु - एकांतात रहाण्याचा योग
मकर - घरगुती कामात हरवून जाल.
कुंभ - कुंभकर्णाप्रमाणे झोप घेण्याचा योग
मीन - घरच्यांसोबत वेळ घालवल्याना आनंद मिळेल.

हे ज्योतिष कोणीही नाकारू शकले नाही. तळटीप अशी ः (पत्रकार, पोलिस, डॉक्टर, नर्स यांना यातून वगळण्यात आलं आहे.)

कुठेही चोरी नाही की अपघात

आज देशात पहिलाच असा दिवस उजाडला की कोणाचाच रस्ता अपघातात बळी गेला नाही. कोणाची घरफोडीही झाली नाही. त्यामुळे पत्रकारांच्या हाती आलेला क्राईम रिपोर्ट असा होता. चोरी - ०, अपघात - ०, दरोडा - ०. मात्र, नवरा-बायकोच्या भांडणांचा आकडा हजारोंच्या संख्येत असलेला दिसून आलं.

जनता कर्फ्यूमुळे घरात बसून अॉनलाईन असलेल्या नेटीझन्सने हे भविष्य वर्तवलं होतं. आणि क्राईम रिपोर्टची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती.