नाक दाबलं, तोंड उघडलं; पण... 

नाक दाबलं, तोंड उघडलं; पण... 

कोल्हापूर - गडहिंग्लजच्या काळभैरवाची यात्रा झाली की साऱ्या तालुक्‍याला यात्रा-जत्रांचे वेध लागतात. एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडला असतानाच आता या यात्रांनाही प्रारंभ झाला आहे. पै-पाहुणे, परगावी असणारे आणि विशेषतः मुंबईला नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक असलेली मंडळी यानिमित्ताने गावाकडे आली आहेत आणि अशातच मतदानावर बहिष्काराचे अस्त्रही काही गावांनी उचलले. प्रशासन खडबडून जागे झाले. बैठका झाल्या आणि बहिष्कार मागे घेतला जाऊ लागला. "नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही' ही एक प्रचलित म्हण आहे आणि गडहिंग्लज, चंदगड तालुक्‍यातील काही गावांनी ती या निवडणुकीत खरीही करून दाखवली आहे. 

गडहिंग्लज तालुक्‍यातील शेवटच्या टोकाची अर्थात सीमाभागातील खणदाळ, नांगनूर, अरळगुंडी, कडलगे आणि इदरगुच्ची ही गावं आणि या पाचही गावांना हिरवीगार करणारी हिरण्यकेशी नदी. चित्री प्रकल्पातून पुढे या गावांना पाणी मिळते. विशेषतः जानेवारीपासून पुढे मेपर्यंत हेच पाणी या गावांना आधार ठरते. प्रकल्प सुरू झाल्यापासून फारशी अडचण कधी आली नाही. मात्र, गेल्या वर्षी दुष्काळामुळे नदी पात्र कोरडेच राहिले. यंदाही सुरवातीच्या टप्प्यात काही अंशी पाणी सोडले. मात्र, नंतर पात्र पुन्हा कोरडे पडले. निवडणुकीचा बिगुल वाजला आणि या पाचही गावांनी पाणी मिळाल्याशिवाय मतदान करणार नाही, असा इशाराच देऊन टाकला. अखेर सर्वच राजकीय नेते व प्रशासन जागे झाले आणि बुधवारी सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊन पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतरच त्यांनी बहिष्कार मागे घेतला. आज अखेर नांगनूरच्या पात्रात पाणी पोचले. मात्र, या प्रश्‍नाच्या मुळाशी गेल्यानंतरच त्याची खरी गुंतागुंत जाणवते. ही पाच गावं नदीच्या एकीकडे आणि दुसरीकडे कर्नाटकातील गावं. चित्री प्रकल्पातून पाणी पुढे आलं की दोन्ही बाजूंनी उपसा सुरू होतो आणि नदी पात्र पुन्हा कोरडे पडते. महाराष्ट्रातील गावांना उपसाबंदी लागू आणि कर्नाटकातील गावांना उपसाबंदीच नाही, हे खरे वास्तव आहे. चंदगड तालुक्‍यातील तेऊरवाडी गावानेही पाण्यासाठीच बहिष्काराचा निर्णय घेतला आणि आश्‍वासनानंतर तो मागे घेतला असला तरी निवडणूक झाल्यानंतर पाठपुरावा केल्याशिवाय मागणी पदरात पडणार नाही, याची जाणीव ग्रामस्थांना नक्कीच आहे. 

बहिरेवाडी, वडरगे मार्गे गडहिंग्लज, निलजी, नूल, बसर्गे, हलकर्णी, हुंबळहाळ, नरेवाडी, हिडदुगी, हसूर सासगिरी, हासूरवाडी, भडगाव, हरळी, बटकणंगले, नेसरी, कानडेवाडी, आडकूर अशा तालुक्‍याच्या वाड्या-वस्त्यांवरून फिरताना पिण्याच्या पाण्याचाच प्रश्‍न अनेक ठिकाणी गंभीर असल्याचे जाणवले. छोट्या गावांची संख्या अधिक असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक होते आहे. रणरणत्या उन्हातही त्यांनी "उंबरा टू उंबरा' संपर्कावर भर दिला आहे. नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात मात्र प्रतिष्ठेची लढत आहे. त्याची चुरस साऱ्या मतदारसंघात स्पष्ट जाणवत आहे. 
 

कुणा-कुणाच्या पाया पडायचं...! 
तालुक्‍यातील छोट्या गावांमुळे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मोठे झाले आहेत. प्रचाराला सहाच दिवस मिळाल्याने उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यातही काही मतदारसंघ राखीव असल्याने कार्यकर्त्यांनी आपल्या मर्जीतल्यांसाठी उमेदवारी खेचून आणली आहे. मात्र, त्यांना कुठल्या गावात, कुठल्या बुडक्‍याला भेटून मतांची बेरीज करायची, याची गणितं माहिती नसल्याने "तुम्ही माझ्याबरोबरच राहा. कुणा कुणाच्या पाया पडायचं- ते तुम्हीच सांगा' असे म्हणायची वेळ आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com