पहिले गांधीनगर रेल्वे गेट उद्यापासून अनुक्रमे दोन दिवस बंद बेळगाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Station

बेळगाव : पहिले गांधीनगर रेल्वे गेट उद्यापासून अनुक्रमे दोन दिवस बंद

टिळकवाडी: दुपदरीकरणाच्या कामानिमित्त टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट व गांधीनगर येथील रेल्वे गेट शनिवारी (ता.१९) व रविवारी (ता.२०) बंद केले जाणार आहे. यासंबंधी माहिती नैर्ऋत्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. यासंबंधी पोलिस आयुक्तांकडून परवानगी घेतली असून वाहनधारकांना अन्य मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.पहिले रेल्वे गेट शनिवारी (ता. १९) सकाळी ९ वाजल्यापासून रविवारी (ता.२०) दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच गांधीनगर येथील रेल्वे गेट रविवारी (ता.२०) सकाळी ८ पासून सायंकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. एक पत्रक काढून याची माहिती रेल्वेने दिली आहे.

बेळगाव शहरात सध्या रेल्वे दुपदरीकरणाच्या कामांनी गती घेतली आहे. रेल्वे स्टेशन तसेच रेल्वे गेटवरील कामे देखील गतीमान झालेली आहेत. यापूर्वी पहिल्या रेल्वे गेटच्या कामनिमित्त चार वेळा पहिले रेल्वे गेट बंद करण्यात आले होते. आता पुन्हा हे गेट बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी गेट बंद असल्याने वाहनधारकांनी दुसऱ्या व तिसऱ्या रेल्वे गेटचा तसेच काँग्रेस रोड व गोगटे सर्कल येथील उड्डाणपुलाचा वापर केला होता. आता पुन्हा दिड दिवस हे गेट बंद असल्याने वाहनधारकांना त्याच मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

तसेच गांधीनगर येथील गेट एक दिवस बंद असल्याने त्या भागातील वाहनधारकांना देखील अन्य मार्गाचा वापर करावा लागणार आहे. बेळगाव शहरात एकूण सहा रेल्वे फाटक आहेत. यामध्ये पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, तानाजी गल्ली व गांधीनगर येथील रेल्वे फाटकाचा समावेश आहे. आतापर्यंत दुसरे, तिसरे व तानाजी गल्लीतील फाटकाचे काम झाले आहे. तसेच पहिल्या गेटचे काम देखील अंतीम टप्यात आहे. सध्या गांधीनगर येथील फाटकाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर चौथ्या गेटचे काम देखील केले जाणार आहे. शहरातील प्रत्येक गेटवर दुपदरीकरण झाल्यास वाहनधारकांनाही सोयीस्कर होणार आहे.