गणेश दर्शनासाठी नेतेमंडळी सक्रिय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh

गणेश दर्शनासाठी नेतेमंडळी सक्रिय

देवगड : दोन वर्षे कोरोनामुळे गणेश दर्शनाची हुकलेली संधी साधण्यासाठी विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी उत्साही आहेत. यंदा कोरोनाचे सावट नाही की कसलीही बंधने नाहीत, अशा आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने नेतेमंडळींचा उत्साह वाढला आहे.

येथील देवगड जामसंडे शहरासह तालुक्याच्या विविध भागात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे राजकीय पक्षांचे फलकही झळकले आहेत. शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ आहे. आजपासून नेत्यांची गणेश दर्शनाचे दौरे सुरू होतील. चाकरमानीही तालुक्याच्या विविध भागात दाखल झाले आहेत. यंदा बंधनमुक्त वातावरण उत्सव साजरा होत असल्याने गावागावांत उत्साहाला उधाण आले आहे. त्यातच विविध पक्षांची नेतेमंडळी गणेश दर्शनाच्या निमित्ताने कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकडे लक्ष ठेवून आहेत.

कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे आणि पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोचवण्यासाठी गणेश दर्शन प्रभावी माध्यम मानले जाते. कार्यकर्तेही मोठ्या उत्साहाने नेत्याचे स्वागत करताना दिसतात. त्यामुळे येथे दहा दिवसांत गणेश दर्शनानिमित्ताने नेत्यांच्या गाठीभेटी होतील. सध्या ग्रामीण भागात सर्वत्र उत्साही वातावरण आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीने गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी सजावट झाली आहे. त्यातच राजकीय पक्षांकडून घरगुती गणेश सजावटीच्या स्पर्धा जाहीर केल्या आहेत. दोन वर्षांत कोरोनामुळे उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. त्याकाळात कोणी कोणाकडे जात नसल्याने घरगुती स्वरुपाचा उत्सव साजरा होत होता.

यंदा मात्र कसलीही बंधने नसल्याने गणेशभक्त उत्साही आहेत. घरोघरी पारंपरिक आरत्या, भजने सुरू झाली आहेत. दोन वर्षांची कसूर भरून काढण्यासाठी भक्तगण आतुर आहेत. त्यातच नेत्यांचे दौरे होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. कार्यकर्ते चांगलेच उत्साही बनले आहेत. नेत्यांच्या दौऱ्यामुळे बाजारातील उलाढालही वाढेल. दोन वर्षांनंतर यंदा नेत्यांच्या गणेश दौऱ्याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे एकूणच वातावरण उत्साही बनले आहे.

निमित्त मात्र प्रचाराचे

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक येत असल्याने इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातच नेत्यांचे गणेश दौरे आखण्यासाठी कार्यकर्ते उत्साही आहेत. गणेश दौऱ्याच्या निमित्ताने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण होईल, असे दिसते. मात्र, आरक्षण पुन्हा बदलणार असल्याने इच्छुकांमध्ये चलबिचल आहे. तरीही दौऱ्यात राहून उमेदवारीची चाचपणी करण्याकडे कल राहील, असे दिसते.

Web Title: Ganesh Chaturthi Traditional Way From House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..