कोरोनाची दहशत, अन् नागरिकांचा `हा` निर्णय नक्कीच कौतुकास्पद

हिम्मतराव नायकवडी
Sunday, 23 August 2020

कोरोनाचा राज्यासह, जिल्ह्यात विशेषतः शिराळा तालुक्‍यात प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने 340चा आकडा पार केला आहे.

बिळाशी (सांगली) - कोरोनाचा राज्यासह, जिल्ह्यात विशेषतः शिराळा तालुक्‍यात प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने 340चा आकडा पार केला आहे. तर शिराळा तालुक्‍यातील 48 गावांमधील कोरोना बाधितांची संख्या 348च्या वर पोहोचली असून तालुक्‍यातील 13 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय कोकरूड पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक मंडळांनी घेतला. पोलिस प्रशासनानेही या निर्णयाचे स्वागत केले. 

शिराळा पश्‍चिम भागात वाढत जाणारा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता शासन निर्णयाच्या परिपत्रकानुसार कोकरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात जनजागृती करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्यासंदर्भात पोलिसांनी सूचना केल्या होत्या. पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मांगरुळ, बिळाशी, कोकरूड, चिंचोली, खुजगाव, मोरेवाडी, शेडगेवाडी, खिरवडे, नाठवडे, मोहरे, चरण, पणुंब्रे, काळुंद्रे, येळापूर, करूंगली, आरळा, मणदूर, मेणी खोरा, चांदोली आदी गावांसह त्यांना संलग्न असणाऱ्या वाड्यांमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

कोरोनाला थोपविण्यासाठी केंद्र, राज्य प्रशासनासह आरोग्य, महसूल, पोलिस, सफाई कर्मचारी, ग्रामपंचायती, कोरोना, आपत्ती समित्या प्रयत्नरत आहेत. त्यांना सहकार्य करण्यासह गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक बांधीलकी जपणारे उपक्रम राबवावेत. 
- दत्तात्रय कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कोकरुड 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav canceled in Kokrud area due to corona