गणेश मंडळांना सवलतीत वीज ; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले असून, हे मीटर प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सातारा : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलत व वहन आकारासह पाच रुपये नऊ पैसे प्रतियुनिट या दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट तीन रुपये 79 पैसे अधिक एक रुपया 30 पैसे वहन आकार असे वीजदर आहेत. याउलट घरगुती व वाणिज्य किंवा इतर वर्गवारीमध्ये वीज वापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्‍चित करण्यात आले आहेत. मात्र, उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीज वापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ पाच रुपये नऊ पैसे दर आकारण्यात येणार आहे. 
गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले असून, हे मीटर प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्‍यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास विद्युत प्रवाहापासून अपघाताची शक्‍यता असते. प्रामुख्याने मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड द्यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी तसेच पावसाच्या पाण्यापासून वीज संचमांडणीही सुरक्षित ठेवावी. 

सुरक्षेबाबत तडजोड नको 

विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्‍यक आहे. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav mandals will get electricity in discounted rate