बहीण-भावाच्या मायेने खडकातही बहरली बाग! 

The garden blossomed in the rocks with the love of sisters and brothers!
The garden blossomed in the rocks with the love of sisters and brothers!

खरसुंडी (जि. सांगली) : बहिणीने धाकट्या भावाचा भविष्याचा वेध घेत जमीन खरेदी करून दिली. मग भावाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर फोंड्या माळरानावर आंब्याची बाग फुलवली. पूर्ण सेंद्रिय व नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या बागेत यावर्षी केशर जातीचा आंबा चांगलाच लगडलाय आणि लवकरच बाजारपेठेत दाखल होण्याच्या मार्गावर आहे. लवकर आंबा तयार झाल्यामुळे उत्पन्नही चांगले मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. 

खरसुंडी येथील श्रीमती ताई रामचंद्र पुजारी यांनी धाकटे भाऊ शिवाजी पुजारी यांना वीस वर्षांपूर्वी अठरा एकर फोंडे माळरान खरेदी करून दिले. साधे गवत उगू शकणार नाही, अशा प्रकारची कठीण खडकाळ जमीन येथे होती. मात्र शिवाजी यांनी बऱ्याच प्रयत्नातून जेसीबी व सुरुंगाच्या साह्याने पाच एकर क्षेत्रात खड्डे खोदले आणि आंब्याची बाग साकारली. या ठिकाणी पाण्याचा कसलाही स्रोत नव्हता. तीन ते चार किलोमीटर अंतरावरून बंदिस्त पाईपलाईन पाणी आणले आणि खडकाळ फोंड्या माळरानावर आंब्याची बाग उभी राहिली. बहीण-भावाच्या मायेतून तयार झालेल्या या बागेला चांगलाच बहर आहे. 

शिवाजी पुजारी यांनी पाच एकर क्षेत्रात सोळाशे केशर जातीची झाडे लावली आहेत. यामध्ये फळधारणा चांगल्याप्रकारे व्हावी, याकरता हापूस, मलकोबा, कलमी, बदामी व देशी झाडांचीही अधूनमधून लागवड केली. पाच वर्षांपूर्वी लागवड करण्यात आलेल्या आंबा झाडांना दोन वर्षांपासून आंबा लगडू लागला आहे. ही संपूर्ण बाग सेंद्रिय पद्धतीने करण्यात येते. कोणतेही रासायनिक खत या औषध वापरण्यात येत नाही. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात सेंद्रिय खते चांगल्याप्रकारे देण्यात आली आणि नोव्हेंबर महिन्यात आंब्याला मोहोर आला. सेंद्रिय औषधाची वेगवेगळी फवारणी देण्यात आल्यामुळे आणि वातावरण चांगले लाभल्याने फळधारणा चांगली झाली आहे. 

केशर व हापूस जातीच्या आंबा झाडांना चांगल्याप्रकारे आंबा सेटिंग होऊन, सध्या पंधरा दिवसांत आंबा तयारीला आला आहे. 14 ते 15 टन आंबा बाजारपेठेत जाण्याच्या मार्गावर आहे. इतर आंबा बागांपेक्षा लवकर फळे तयारी झाली आहेत. सध्या बाजारपेठेत आंबा कमी प्रमाणात येत असल्यामुळे पुजारी यांना चांगला दर मिळण्याची शक्‍यता आहे. इतर जिल्ह्यातील दोन व्यापाऱ्यांनीही बागेची पाहणी केली आहे. 
यावर्षी आंबा जास्त व दरही दोनशे रुपये किलोपेक्षा अधिक मिळण्याची शक्‍यता आहे. पूर्ण सेंद्रिय असल्याने बाहेरच्या देशात निर्यात करण्याचाही त्यांचा विचार आहे. शिवाजी यांचा मुलगा अमितही या आंब्याची बाग चांगल्या प्रकारे जोपासणे व चांगली प्रतवारी आणणे आणि व्यापारी पाहणे या कामी मदत करीत आहे. 

बहीण म्हणून माझे कर्तव्य भावाकरता केले
बहीण म्हणून माझे कर्तव्य भावाकरता केले आणि भाऊ शिवाजी यांनी जिद्द व कष्टाच्या जोरावर चांगल्या प्रकारची आंबा बाग जोपासली. त्याचे फळ त्यांना मिळत आहे. 
- ताई रामचंद्र पुजारी, बहीण 

इतर शेतकऱ्यांनीही पडीक माळरानावर  चांगले उत्पन्न घ्यावे

जमीन खराब व पाणी नाही दुष्काळी भाग आहे, याचा विचार न करता चिकाटीने कष्टाच्या जोरावर आंबा लागवड केली. इतर शेतकऱ्यांनीही पडीक माळरानावर आंबा लागवड करून चांगले उत्पन्न घ्यावे. 
- शिवाजी पुजारी, भाऊ 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com