गौरी, शंकरोबा, चाफा बनला जगण्याचा आधार

अर्चना बनगे
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

गौरी गणपतीचा उत्सव दुर्गम भागातून येणाऱ्या अनेक कुटुंबांना अर्थार्जनाचे साधन ठरला आहे. दररोज 70 किलोमीटर अंतरावरून कुटुंबच्या-कुटुंब गवर शंकरोबा, चाफ्याचे पान विकण्यासाठी कोल्हापूर सारख्या शहरात येतात. हा केवळ आनंद उत्सव न राहता लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.

कोल्हापूर : गौरी गणपतीचा उत्सव दुर्गम भागातून येणाऱ्या अनेक कुटुंबांना अर्थार्जनाचे साधन ठरला आहे. दररोज 70 किलोमीटर अंतरावरून कुटुंबच्या-कुटुंब गवर शंकरोबा, चाफ्याचे पान विकण्यासाठी कोल्हापूर सारख्या शहरात येतात. हा केवळ आनंद उत्सव न राहता लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.

भारतीय संस्कृतीत गणेशोत्सवाला अतिशय महत्त्व आहे. घरगुती गणपती बरोबरच गौरी बसवणे हा महिलांचा सण असतो. अनेक महिला एकत्र येऊन घरांमध्ये गोडधोड करून गौरीचे पूजन करून हा सण साजरा करतात. मात्र हाच सण अनेक महिलांचा आधार बनला आहे.

पहाटे सकाळी लवकर उठायचं डोंगरावर जायचं गवर, शंकरोबा तोडायचा गाठोड बांधायच, कुठे खाल्लं कुठं नाही खाल्लं पळत गाडी पकडायची आणि सत्तर किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूर गाठायचं. हा प्रवास गेली वीस वर्ष राजारामपुरी याठिकाणी मलकापूर, आंबा आणि कोल्हापूरपासून आजूबाजूच्या खेड्यातून या दुर्गम भागातून विकण्यासाठी येतात. वर्षभर धुणीभांडी करायचं किंवा मिळेल ते काम करायचं आणि वर्षातून दोन दिवस मात्र हे हक्काचं काम त्याला कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही.

निसर्गाने दिलेल्या देणगीतूनच अर्थार्जन करायचे. या उद्देशाने कुटुंबे कोल्हापूर मध्ये येतात. काहीजण गौरीच्या आधी दोन दिवस राहायला येतात तर काही जण पहाटे त्याच दिवशी येऊन दिवसभर थांबून विकून निघून जातात. अनेकांसाठी हा सण उत्सवाचा असतो मात्र यांच्यासाठी उदरनिर्वाहाचे एक साधन म्हणून गौरी-गणपती हा सण असतो.

मी दरवर्षी गौराई, शंकरोबा घेण्यासाठी या ठिकाणी येते कारण ग्रामीण भागातून हे लोक खूप वर्षापासून या ठिकाणी येतात आणि पैसे देण्यापेक्षा यांनाच पैसे देऊन त्यांना मदत व्हावी या उद्देशाने दरवर्षी राजारामपुरी घ्यायला येते. - वनीता व्हटकर

आम्ही पहाटे लवकर उठून डोंगरावर  जाऊन गौराई, शंकरोबा तोडून गाठोड बांधून घेऊन येतो आणि आदल्या दिवशी कोल्हापुरात वस्तीला कुटुंबासहित येतो दोन दिवस राहून विकून मग आम्ही घरी जातो.- मनीषा जाधव, मलकापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri and Ganesh festival support for Poor family for small scale business