जखम सुगंधी देऊनी इलाही गेला.... 

Gazal poet Ilahi jamadar died
Gazal poet Ilahi jamadar died

"अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा... जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा...' यांसारख्या अजरामर गझलांनी आणि कवितांनी रसिकांच्या काळजात घर करून राहिलेल्या प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वांना धक्का बसला. गझल आणि दोह्यांचा आवाजच जणू हरपला. दु:ख आणि वेदनांना शब्दबद्ध करून "जखमा अशा सुगंधी' सांगणारे इलाही यांचे जीवनाच्या मैफलीतून जाणे रसिक व चाहत्यांसाठी धक्कादायकच आहे. 

सांगली जिल्ह्यातील वारणाकाठच्या दुधगावात एक मार्च 1946 रोजी जन्मलेल्या इलाही यांनी 18 व्या वर्षापासून काव्य करायला सुरवात केली. त्यानंतर गेल्या 50 वर्षांत त्यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गझला आणि कविता बरसल्या. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांचा आणि चाहत्यांचा पसारा वाढतच गेला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर लाखो रसिकांचा एक परिवारच त्यांच्याशी जोडला गेला.

दूरदर्शन टेलिफिल्मसह हिंदी आणि मराठी धारावाहिक मालिकांसाठी गीतलेखन केले, तसेच ध्वनिफिती प्रकाशित झाल्या. हिंदी संगीतिका, नृत्यनाट्य, तसेच राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाटकांसाठी त्यांनी गीतलेखन केले. व्यावसायिक नाटकांच्या गीतलेखनातही त्यांचा हातखंडा होता. मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केले. अनेक पुरस्कारही मिळवले. त्यांनी हिंदीतील सहा पुस्तके मराठीत अनुवादित केलेली आहेत. जखमा अशा सुगंधी, मला उमगलेली मीरा, समग्र दोहे इलाही, गुफ्तगू, अर्घ्य, चांदणचुरा, रंगपंचमी, निरागस, फुलपाखरू, अभिसारिका, भावनांची वादळे, वाटसरू, सखये, मोगरा, तुझे मौन, ओयासिस, आभास, अनुराग, अनुष्का आणि 15000 दोह्यांचा समावेश असलेले "दोहे इलाहीचे' भाग 1 आणि भाग 2 हे दोन संग्रह त्यांच्या नावे आहेत. पाटबंधारे विभागात नोकरी करताना त्यांनी गझल, कविता, गीतांना मनात बांध न घालता कागदावर वाट मोकळी करून दिली. 

गझलकार सुरेश भट यांनी मराठी गझलेला एका उंचीवर नेऊन पोहोचवले होते. त्यांच्यानंतर रसिकांच्या काळजात इलाही यांच्या गझलांनी जागा मिळवली. मनातील दु:ख, वेदना आणि वादळांना त्यांनी ताकदीने गझल आणि कवितांतून शब्दबद्ध करताना स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला. जखमादेखील सुगंधी असतात, हे सांगत रसिकांना शब्दरूपी दिलासा दिला. वेदनेवर शब्दरूपी फुंकर मारून जगण्याचे बळ त्यांनी दिले होते. कबिराचे दोहे मराठीत आणणारे इलाही हे एकमेव. त्यांच्या शब्दातील "लिहिल्या कविता, लिहिल्या गझला, गीते लिहिली, सरस्वतीचा दास म्हणालो, चुकले का हो' अशा शब्दरूपी आठवणी निश्‍चितच सर्वांच्याच हृदयात चिरंजीव राहतील. 

मराठी गझलेला नवे आयाम देणारे इलाही 
उर्दू आणि हिंदीतून गझल मराठीत येताना तिने तिच्यावरील "मदिरा, मदिराक्षी'चा शिक्‍का पुसून टाकला. हे करताना सामाजिक, भावतरल रंगांचे आयाम दिले. इलाही जमादार हेही त्यामध्ये अग्रणी होते. "वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?' असा सवाल विचारत त्यांनी भरकटत चाललेल्या माणसाला "आरसा' दाखवला. 

हुंदका माझा कसा बंदिस्त आहे, 
आसवांना लावलेली शिस्त आहे 
यौवना जाऊ नको बाहेर कोठे 
भोवताला वासनेची गस्त आहे 
राहिला नाही भरवसा पावसाचा 
आसवांवरती पिकांची भिस्त आहे 

या त्यांच्या गझलेच्या ओळी समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करत महिला आणि शेतकऱ्यांचीही व्यथा मांडतात. "ऐ सनम आँखों को मेरी, खूबसूरत साज दे; येऊन स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे' हा हिंदी-मराठी गझलेचा प्रयोगही त्यांनी केला आहे. त्यांच्या अशा एकापेक्षा एक गझला रसिकांच्या मनात कायम घर करून राहणार आहेत. 

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com