कोरोनासदृश लक्षणे असलेल्यानी चाचणी करून घ्यावी...

बलराज पवार 
Thursday, 6 August 2020

महापालिकेच्या वतीने कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच बहुविध आजार असलेल्या व्यक्तींसाठी रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे.

सांगली : महापालिकेच्या वतीने कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच बहुविध आजार असलेल्या व्यक्तींसाठी रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रात दहा नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षांवरील नागरिकांनी तसेच कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

महापालिका क्षेत्रात गेल्या पंधरवड्यात रॅपिड अँटिजेन चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यासाठी सांगलीत सहा तर मिरजेत चार ठिकाणी आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. सांगलीत जामवाडी, साखर कारखाना, शामरावनगर, त्रिमूर्ती कॉलनी (हनुमाननगर), विजय कॉलनी (विश्रामबाग), अभयनगर या ठिकाणी ही केंद्रे आहेत, तर मिरजेत गुडवील कॉलनी (समतानगर), 100 फुटी रोड (द्वारकानगर), इंदिरानगर (जवाहर चौक) आणि लक्ष्मी मार्केट येथे ही केंद्रे सुरू आहेत. 

महापालिकेच्या वतीने कंटेन्मेंट झोनबाहेरच्या नागरिकांसाठी रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आयुक्तांनी या चाचण्या प्राधान्याने कंटेन्मेंट झोनमधील कोणतीही लक्षणे नसलेल्या 50 वर्षांवरील व्यक्ती व बहुविध आजार असलेल्या व्यक्तींसाठी ही चाचणी असल्याचे स्पष्ट केले. तसेच ताप, सर्दी, घसा खवखवणे, थकवा, श्‍वास घेण्यास त्रास होणे आदी कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत. नागरिकांनी जवळच्या 
आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. 

पाच हजार चाचण्या 
महापालिका क्षेत्रात 20 जुलैपासून रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. आजअखेर 5035 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 531 रुग्ण आढळले आहेत. या चाचण्यांना इंदिरानगर तसेच गवळी गल्लीतील नागरिकांनी विरोध केला होता. मात्र आयुक्तांनी समजूत काढल्यानंतर या भागातील नागरिकांनीही या चाचण्या करुन घेतल्या. गेले 17 दिवस या चाचण्या करण्यात येत आहेत. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get tested for corona-like symptoms ...